गंगेत मृतदेह आणि निवडणुकांमध्ये काळा पैसा वाहतोच आहे; शिवसेनेची भाजपवर टीका

bjp vs shivsena

मुंबई : २०१४ लोकसभा निवडणुकांपासून भाजपने केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली. सध्या भाजप हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. २०१४ पासून काँग्रेसला लागलेली उतरती कळा ही २०१९ मध्येही कायम राहिली. आणि भाजपने २०१४ हुन अधिक जागा मिळवत च्या मोदी सरकार २.० ची स्थापना केली. भाजपला सत्तेसह आर्थिक स्वरूपात देखील मोठा फायदा झाला आहे.

२०१९-२० मधील देणग्यांच्या माहितीनुसार भाजपला आलेल्या देणग्यांची रक्कम ही जवळपास काँग्रेसच्या पाच पट आहे. २०१९-२० या वर्षात भाजपला तब्बल ७५० कोटी रुपयांची रक्कम देणगी मिळाली आहे. तर, याच काळात काँग्रेसला १३९ कोटी रुपये इतकी रक्कम देणगी म्हणून मिळाली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. भाजपला मिळालेल्या देणगीवरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेची सामनातून टीका –

उद्योगपती , बिल्डर्स , ठेकेदार , व्यापारी मंडळी कोटय़वधीच्या देणग्या एखाद्या राजकीय पक्षास देतात ते काय फक्त धर्मादाय म्हणून ? या देणग्यांची वसुली पुढच्या काळात व्यवस्थित होतच असते. निवडणुका हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे . काळय़ा पैशांचा धबधबा तेथेच वाहत आहे . लोकशाही भ्रष्ट आहे म्हणून राज्य व्यवस्था भ्रष्ट होते . परदेशातील काळय़ा पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता . हा हजारो कोटींचा काळा पैसा परत आणू व देशाची भ्रष्ट अर्थव्यवस्था स्वच्छ करू , असे मोदींचे वचन होते म्हणून लोकांनी मतदान केले . तो काळा पैसा कधी आलाच नाही . तो काळा पैसा निवडणुकीत वाहतोच आहे . गंगेत प्रेते तरंगत आहेत . निवडणुकांत काळा पैसा वाहतो आहे . राजकारणात पैसाच बोलतो आहे !

सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्त्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. तुझी जात कोणती हा पहिला प्रश्न उमेदवारास विचारला जातो. खर्च करण्याची ताकद किती? हा दुसरा प्रश्न. त्यामुळे जात आणि पैसा या दोन प्रमुख गोष्टी सध्या निवडणुकीच्या राजकारणात जोरात आहेत.

उमेदवार मालामाल असावे लागतात, तसे राजकीय पक्षही आपापल्या परीने मालामाल होत असतात. हा हिशोब सांगण्याचे कारण असे की, ताज्या बातमीनुसार फक्त एका वर्षात भारतीय जनता पक्षाला 750 कोटी रुपयांच्या भरघोस देणग्या मिळाल्या आहेत. हा अधिकृत देणगीदारांचा आकडा आहे. बाकी टेबलाखालचे वेगळे! या गलेलठ्ठ देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून तसेच व्यक्तिगत स्वरूपातही मिळाल्या आहेत. 2019-20 या एका वर्षातला हा अत्यंत किरकोळ हिशोब आहे.

या काळात सोनिया गांधी यांच्या राष्ट्रीय काँग्रेसला 139 कोटी रुपये देणगीदाखल मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा तिसऱया क्रमांकाचा श्रीमंत पक्ष दिसतोय. त्यांना 59 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. तृणमूल काँग्रेसला 8 कोटी रुपये, सीपीएमला 19.6 कोटी आणि सी.पी.आय.ला 1.9 कोटी रुपये देणगीरूपाने मिळाले असल्याचे अधिकृत आकडे समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचा 750 कोटी हा आकडा प्रत्यक्षात अधिक मोठा असू शकेल, कारण निवडणूक आयोगास सादर केलेल्या अहवालात 20 हजारांपेक्षा जास्त रकमा देणाऱ्यांचीच नावे सादर केली जातात. त्यामुळे 20 हजारवाले कोटय़वधी लोक असू शकतात.

भाजपचे देणगीदार कोण ?

भारतीय जनता पक्षाची श्रीमंती डोळय़ात खुपते असे म्हणणे चुकीचे आहे. श्रीमंती डोळय़ात भरते असेच म्हणावे लागेल. भाजपला 2019-20 मध्ये जे भव्य देणगीदार लाभले आहेत ते कोण आहेत? त्यात अंबानी, अदानी, मित्तल, टाटा, बिर्ला ही हमखास नावे नाहीत. सगळय़ात मोठे दानशूर फुडेंट इलेक्टोरल ट्रस्ट असून त्यांनी 217.75 कोटी रुपये भाजपला दान दिले आहेत.

आयटीसी ग्रुपने 76 कोटी, जनकल्याण ट्रस्टने 45.95 कोटी, शिवाय महाराष्ट्रातील बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे 35 कोटी, लोढा डेव्हलपर्सचे 21 कोटी, गुलमण डेव्हलपर्सचे 20 कोटी, जुपिटर कॅपिटलचे 15 कोटी असे मोठे आकडे आहेत. देशातील 14 शिक्षण संस्थांनी भाजपच्या दानपेटीत कोटय़वधी रुपये टाकले आहेत. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे आहेत. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला. पैशांची ने-आण करण्यासाठी विमाने व हेलिकॉप्टरचा वापर झाला. तो सर्व कारभार पाहता 750 कोटीच्या देणग्या म्हणजे झाडावरून गळून पडलेली सुकलेली पानेच म्हणावी लागतील.

महत्त्वाच्या बातम्या

IMP