पूर्वीप्रमाणे शिवसेना राहिली नसल्याचे सांगत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

rpi

मुंबई : आगामी 2022 च्या मुंबई महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप आणि शिवसेनेने पालिकेवर सत्ता आणण्याचा चंग बांधला असताना मुंबईत शिवसेनेत काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. यातूनच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे.

बांद्रा येथील संविधान निवासस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेल मधील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी बोलताना शिवसेनेचा पराभव नक्की असून भाजप आरपीआय युतिचा झेंडा मुंबई मनपावर फडकेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उत्तर भारतीय सेलचे उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष रमेश संतलाल गौड,निमित्त तन्ना,डेमियल डीसा,श्रीमती कृष्णा गुलाब गौड आदींच्या नेतृवात शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवशक्ती भीमशक्ती एकजूट आता शिवसेने ने संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रिपब्लिकन पक्ष भाजप युती निवडणूक मैदानात उतरेल असा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पूर्वीसारखी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेने सारखी राहिली नाही. त्यामुळे शिवसेना सोडून आम्ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. उत्तर भारतीयांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात नेहमी रिपब्लिकन पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे असे मनोगत शिवसेनेतून आरपीआय मध्ये प्रवेश केलेले रमेश संतलाल गौड यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या