fbpx

शिवसेना १५ दिवसात लोकसभा, तर २ महिन्यात विधानसभा उमेदवार निश्चित करणार

Uddhav Thackeray

मुंबई: शिवसेना २०१९ निवडणुकांसाठी तयारीला लागली आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची चाचपणी करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पुढच्या पंधरा दिवसात लोकसभा उमेदवार, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार निश्चित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये खासदार संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर, मिलिंद नार्वेकर आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा आणि ३६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.

नागपूरमध्ये रवीभवनात पूर्व आणि पश्चिम विदर्भाची आढावा बैठक ११ मे रोजी घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अरविंद नेरकर यांच्यासह स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विदर्भातील ११ लोकसभा आणि ८४ विधानसभा मतदारसंघांसाठी चाचपणी केली जाणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या ८ लोकसभा आणि ४८ विधानसभा उमेदवार चाचपणीसाठी पुढच्या आठवड्यात पुण्यात बैठक होणार आहे, तर ठाणे-कोकणच्या पाच लोकसभा आणि ३० विधानसभा मतदारसंघाच्या चाचपणीसाठी ठाण्यात बैठक होणार आहे.