मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी(Mamata Banrjee) ह्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या विषयांवरून चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधी आघाडी उभी करण्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वाचा फोडली. याचविषयी आता शिवसेनेने देखील आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. ‘देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला. यूपीए नाही तसा एनडीएही नाही. मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे’, अशा शब्दांत शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात म्हंटले आहे की,’भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न. ममता बॅनर्जी या प. बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंडय़ा चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे. ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. प. बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे. काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे.’
दरम्यान, काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर प्राप्त केली तेच लोक काँग्रेसचा गळा दाबत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली नसेल, असा शाप दिला आहे. आजची स्थिती कायम राहिल्यास काँग्रेसची स्थिती निराशाजनक राहील, असे श्री. आझाद म्हणतात. आझाद वगैरे मंडळींनी ‘जी 23’ नामक असंतुष्टांचा गट स्थापन केला आहे व त्या गटातील जवळ जवळ प्रत्येकाने काँग्रेसकडून सत्ता-सुख भोगले. मग या गटातील तेजस्वी मंडळाने काँग्रेसची आजची स्थिती सुधारण्यासाठी काय केले? की या तेजस्वी मंडळासही आतून वाटते की, २०२४ साली काँग्रेसची कामगिरी निराशाजनक व्हावी. जे भाजपास वाटते तेच या मंडळींना वाटते हा एक अपूर्व योगायोगच म्हणावा लागेल. काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील ‘गेम चेंज’ होणार नाही. त्यामुळेच भाजपची रणनीती काँग्रेसला रोखण्याची असेलच, पण हीच रणनीती मोदी अथवा भाजपविरोधाच्या मशाली पेटवणाऱयांनी ठेवली तर कसे व्हायचे? देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. त्याचप्रमाणे ‘यूपीए’चे तुम्ही काय करणार? हे एकदा तरी श्रीमती सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन सांगायला हवे’, असेही लेखात म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एसटी महामंडळाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- गुलाम नबी आझाद यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,’२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला…’
- भारतात ओमायक्रॉन आढळल्यास आश्चर्य वाटणार नाही- डॉ. समीरन पांडा
- …यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?- संजय राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<