‘विनाशकाले विपरीत बुद्धी, पुतळ्याला काळे फासून सावरकरांचे विचार संपणार आहेत का ?’

blank

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसवाल्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे. कार्यकर्त्यांच्या हाताला काम नाही. नेत्यांकडे विकास दृष्टी नाही त्यामुळे स्वतंत्र्य सैनिकांच्या पुतळ्याची विटंबना करणे. सावरकरांसारख्या महापुरुषाच्या पुतळ्याला काळ फासणे अशी कृत्य केली जात आहेत. त्यामुळे अशी कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत, असे म्हणत शिवसेना नेते किरण साळी यांनी दिल्ली येथे  झालेल्या सावरकरांच्या पुतळेच्या विटंबने बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली आहे. एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले आहे. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

याबाबत किरण साळी म्हणाले की, कॉंग्रेस वाल्यांना विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली आहे. त्यामुळे असे कृत्य करत आहेत. असे कृत्य करणाऱ्यांना सावरकरांच्या इतिहासाबाबत काय माहित आहे. त्यांनी इतिहास तरी वाचला आहे का ? आणि असे काळे वगैरे फासून सावरकरांचे विचार संपणार आहेत का ? उलट अशा कृत्यांमुळे सावरकरांची महती वाढत आहे. लोक सावरकरांना वाचत आहेत. त्यामुळे असे निंदनीय कृत्य करणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखला होयला पाहिजेत.

दरम्यान या प्रकरणासंबंधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते मंदार जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी या घटनेचा 100 टक्के निषेधच करतो. कोणत्याही महापुरुषांची विटंबना हा आपल्या इतिहासाचा अपमान आहे,.आणि महापुरुषांची विटंबना करणे ही प्रकारची एक विकृती आहे. कॉंग्रेस चा सर्वत्र जो पराभव होत चाललेला आहे त्याच निराश पणाची ही विकृती आहे.