भाजपचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे- शिवसेना

Uddhav-Thackeray-Amit-Shah-Pm-Modi

मुंबई: भाजपने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत! अशी मिश्कील टिपणी शिवसेनेने आजच्या सामनातून भाजपवर केली आहे. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजप अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे. भाजपला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही. असे शिवसेनेने स्पष्ट केले. सामना सत्ताधारी भाजपवर टीका करण्यासाठी चर्चेत असते. आज पुन्हा सामनातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Loading...

वाचा आजचा सामनाचा अग्रलेख 

भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णकाळासाठी कामाला लागा असे आवाहन त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमितभाई शहा यांनी केले आहे. भाजपचा स्थापना दिवस सोहळा मुंबईत साजरा झाला. त्या निमित्ताने अध्यक्ष महोदयांनी विचारांचे भस्म उधळले आहे. स्थापना मेळावा प्रचंड झाला. सत्ताधाऱ्यांना साजेशा श्रीमंती थाटात झाला. राज्यात व केंद्रात सरकारे असल्याने हे होणारच. यापूर्वी मुंबईतील काँग्रेसची अधिवेशनेही अशीच थाटात झाली आहेत. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी असा आरोप केला की, या मेळाव्यावर किमान पन्नास कोटींची उधळपट्टी झाली आहे. (चव्हाण, जपून बोला, नाहीतर भुजबळांच्या बाजूच्या रिकाम्या कोठडीत बसावे लागेल!) महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटली असताना एखाद्या मेळाव्यावर इतका खर्च झाला असेल तर ते बरे नाही. नोटाबंदीमुळे सामान्य लोक, नोकरदार व व्यापारी वर्गाचे कंबरडे साफ मोडले असले तरी सत्ताधारी पक्षावर नोटाबंदीची कृपादृष्टी जरा जास्तच झालेली दिसते. पंतप्रधान मोदी हे नेहमीच विक्रमी गर्दीच्या सभा घेतात. मोदी यांचा गर्दीचा विक्रम बीकेसीत अमित शहा यांनी मोडला व त्यासाठी मुंबई भाजपने खास मेहनत घेतली. ६ एप्रिल १९८० रोजी ‘भाजप’ची स्थापना झाली तेव्हा गोधडीत असलेले अनेक जण कालच्या मेळाव्यात व्यासपीठावर स्थानापन्न होते. मात्र ज्यांनी भाजपची स्थापना केली आणि ज्यांच्या कष्टामुळे भाजप वाढला ते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर

नेते ‘हयात’ असूनही

व्यासपीठावर तर सोडा, निमंत्रितांमध्येही दिसले नाहीत. या स्थापना दिवसासाठी जी प्रचंड गर्दी जमली होती त्यात हे ‘चेहरे’ हरवलेलेच होते. पुन्हा या गर्दीने दोन दिवस मुंबईच्या जनजीवनास ‘बूच’ लावला. संतापलेला नोकरदार मुंबईकर रस्त्यावर उतरला व भाजप स्थापना दिवसास निघालेल्या गाडय़ा अडवून निषेध केला. मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचीही यानिमित्ताने वाट लागली. अनेक रेल्वे स्थानके, मुंबईतील परिसर ‘घाण’ झाला व त्याची छायाचित्रे इतर वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली आहेत. पन्नास कोटी रुपये खर्च झाला असे म्हटले जाते ते कितपत खरे आहे? कारण मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेळाव्यास आलेल्या झुंडीच्या झुंडी रेस्टॉरंटमध्ये घुसत होत्या व मनाप्रमाणे खाऊन ‘बिल’ वगैरे न देत बाहेर पडत होत्या. त्यामुळे हॉटेलवाल्यांना भुर्दंड सोसावा लागला, पण सरकार पक्षाचा मेळावा असल्याने हे सर्व गृहीत धरायलाच हवे. राष्ट्रीय अध्यक्षांनी भाषणात सांगितले की, त्यांचे सरकार सिंहाचे आहे. सिंहालादेखील भूक लागते व सिंहाचा वाटा इतरांपेक्षा मोठा असतो हे मुंबईत आलेल्या सिंहांनी दाखवून दिले. भाजपचा सुवर्णकाळ सध्या सुरू असल्याने ‘उपाशी’ राहायचे नाही व नोटाबंदी वगैरेंची फिकीर करायची नाही हे तर ओघाने आलेच. अमितभाईंचे भाषण दमदार झाले व त्यांनी भाजप विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. भाजपचे विरोधक हे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी आहेत.

एकमेकांशी वैर असलेले हे प्राणी

मोदी महापुरात निभाव लागणार नाही म्हणून एकत्र आल्याचा विचार श्री. अमित शहा यांनी मांडला. ‘यूपीए’ सरकारच्या काळातही यातले काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होते व मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे. शिवसेनेचा वाघ हा पिंजऱ्यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही. राष्ट्रीय अध्यक्षांकडून भ्रष्टाचार, कश्मीरातील न थांबणारा हिंसाचार, दलितांचा हिंसाचार यावर परखड मतप्रदर्शनाची अपेक्षा होती. त्यावर काहीच भाष्य झाले नाही. २०१४ साली मोदींच्या महापुरात साप, मुंगूस, कुत्री, मांजरी वाहून गेली तसे २०१८ च्या भाजपच्या स्थापना मेळाव्यात राष्ट्रीय विचार वाहून गेले. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजप अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे. भाजपला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही. सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...