उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा आरोप असलेल्या निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पारनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्य़ातील निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे माहीत दिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. सुरुवातीला लंके यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मेळाव्यात येऊन शक्तिप्रदर्शन केले.

भाषणात विजय औटी यांनी नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळला. याचा राग निलेश लंके समर्थकांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला. सभा संपून ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा निघाला तेव्हाही घोषणाबाजी सुरूच होती. काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याच्या देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ताफ्याच्या पाठोपाठ विजय औटीही आपल्या गाडीतून निघाले. काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीच्या मागे धावले. त्यामुळे औटी यांच्या चालकाने गाडी वेगाने पुढे घेतली. तेथे उपस्थित असलेले उपनेते अनिल राठोड यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते जखमी झाले. याचा राग आल्यावर कार्यकर्त्यांनी औटी यांच्या गाडीची काच फोडली.

You might also like
Comments
Loading...