औरंगाबादमध्ये विनापरवानगी शिवसेनेचा मोर्चा सुरु ; शिवसैनिक ताब्यात

औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास क्रांती चौकातून सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून विनापरवानगी मोर्चा काढाल, तर गुन्हे नोंदवू आणि अटकेची कायदेशीर कारवाईही केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काल दिला होता. या इशाऱ्याला डावलून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला आहे.

शहरातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, शिवसेना कार्यकर्ता लच्छू पहिलवान यांना अटक केली. या अटकेनंतर शिवसेनेने पोलिसांची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने आजचा मोर्चा आयोजिल केला आहे. आज सकाळपासूनच क्रांती चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते जमत होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना मोर्चा निघत असल्याने मोर्चा सुरु होण्यापूर्वी सेना पदाधिकाऱ्यांचा पोलिसांना सोबत वाद झाला. हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटीचौक, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा जाणार आहे.