सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना फुंकणार रणशिंग !

सांगली : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे नेते सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. ८ जानेवारी रोजी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात महापालिकेतील काही नगरसेवकांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

शिवसेनेचे युवा नेते नगरसेवक शेखर माने यांच्या पुढाकाराने येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दुपारी चार वाजता हा मेळावा होत आहे. गत दोन महिन्यापूर्वी सांगली जिल्हा दौ-यावर आलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी महापालिका निवडणूक ताकदीने लढविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शिवसेनेच्या दुस-या फळीतील नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रात मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. राज्यस्तरावरील शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

महापालिका क्षेत्रात मर्यादित असलेली शिवसेनेची ताकद शेखर माने यांच्या पक्षप्रवेशाने चांगलीच वाढलेली आहे. त्यातच शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर गटाने उघडपणे शिवसेनेसमवेत कामास सुरूवात केली आहे. त्यामुळे नावापुरती असलेली शिवसेना आता महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात आव्हान उभे करू लागल्याने मित्रपक्ष भारतीय जनता पक्षासह विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस नेते चांगलेच धास्तावलेले आहेत.

शेखर माने यांच्यासह माजी आमदार संभाजी पवार व सांगली जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्याही राजकीय ताकदीचा मोठा लाभ शिवसेनेला महापालिका निवडणुकीत होणार आहे. संभाजी पवार यांचे चिरंजीव नगरसेवक गौतम पवार यांचा सहभाग असलेली स्वाभिमानी विकास आघाडीही शिवसेनेशी संलग्न आहे, तर दिगंबर जाधव यांच्या पत्नी श्रीमती पद्मिनी जाधव कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. हे सर्व गट एकसंघपणे महापालिका निवडणुकीस सामोरे गेल्यास सर्वच विरोधी राजकीय पक्षांना शिवसेना हा समर्थ पर्याय ठरणार आहे.

गत काही दिवसात शेखर माने यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची वाढती ताकद लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भगवा खांद्यावर घेत आहेत. उद्याच्या मेळाव्यातही शेखर माने यांच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यात अनेकांचा पक्षप्रवेश होत आहे. याशिवाय उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार घराघरात शिवसेना पोहोचविण्यासाठी प्रभागनिहाय सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभही केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणारा हा शिवसेनेचा पहिलाच मेळावा ‘ना भूतो न भविष्यती’ असा यशस्वी करण्यासाठी शेखर माने यांच्यासह जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व संजय विभुते विशेष प्रयत्नशील आहेत.

You might also like
Comments
Loading...