पुणेकरांचे पाणी कमी केल्यास रस्त्यावर उतरणार – शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा – पाटबंधारे विभागाकडून पुणे शहराचा पाणीपुरवठा 11.50 टिमसीवरून 8.19 करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान आज पाटबंधारे विभागाच्या या निर्णया विरोधात पुणे महापालिकेत शिवसेनेकडून हंडा मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी पुणेकरांच्या हक्काचे पाणी कमी केल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा शिवसेनेचे गटनेते अजय भोसले यांनी दिला आहे. आंदोलनावेळी जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

जलसंपदा विभागाकडे ग्रामीण भागातील काही शेतक-यांनी पुण्यात जास्त पाणी वापरले जात असल्यामुळे शेतीला पाणी कमी मिळते, अशी तक्रार केली होती. तक्रारीच्या सुनावणीनंतर या विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी महापालिकेने पाण्यात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी, असा आदेश दिला आहे।