भाजपच्या ताब्यात असलेल्या मावळमधून शिवसेना उत्सुक; उमेदवारीसाठी दोघांनी दिल्या मुलाखती

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तयारी सध्या जोरदार सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष सध्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. परंतु आघाडी आणि युतीचे जागावाटप अजून झालेले नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. अशातच जागावाटपात भाजपकडे असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनी तयारी सुरु केली आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघांतून दोन जणांनी शिवसेना भवन मुंबई येथे इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या आहेत. शिवसेना तालुका राजेश खांडभोर व पंचायत समिती सभापती शरद हुलावळे यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे काल मुलाखती दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोघांना बोलावून तयारीला लागण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, मावळ विधानसभा मतदारसंघ युतीत परंपरागत भाजपकडे आहे. इथे भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. युती झाली नाही तर शिवसेना इथे भाजपपुढे आव्हान निर्माण करू शकते. इच्छुक म्हणून मुलाखत दिलेले राजेश खांडभोर हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेत.त्यांच्या पत्नी वडेश्वर गावच्या मा. सरपंच आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांचे ते जवळचे सहकारी आहेत. शाखाप्रमुख, उपतालुकाप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पक्षाचा ग्रामीण चेहरा म्हणून ते परिचित आहेत.

तसेच शरद हुलावळे मावळ तालुका पंचायत समितीचे सभापती होते. उपसभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत असलेल्या कार्ला ग्रामपंचायतीवर त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. त्यांनी उपतालुकाप्रमुख, संघटक, समन्वयक म्हणून पक्षात काम पाहिले आहे. सभापती व उपसभापती कार्यकालात केलेल्या कामांमुळे त्यांचा तालुक्यात संपर्क आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचे जवळचे सहकारी आहेत. तसेच ग्रामीण भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.