पैशाच्या नोटा घेऊन तुमच्या दारात उभं राहायचं का: दिवाकर रावते

राज्यातला शेतकरी गारपिटीमुळं देशोधडीला लागलाय. अशा अवस्थेत शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे मंत्र्यांनी अपेक्षित होतं. पण वाशिममध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी चक्क शेतकऱ्यांनाच दम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वाशिम जिल्ह्यात दिवाकर रावते गारपिटग्रस्त भागाच्य़ा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणं त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन सरकार तुमच्या पाठिशी आहे असं बोलणं अपेक्षित होतं. पण रावते अगोदरच संतापलेले होते.

गव्हाच्या शेतात त्यांनी गव्हाची एक लोंबी हातात घेतली. शेतकरी म्हणाले हरभरा पाहायला चला… हे ऐकल्यावर रावते पुन्हा तडकले… त्यांना हरभऱ्याच्या शेतात जायचंच नव्हतं… एवढ्यात एक शेतकरी मदत कधी मिळणार असं म्हणाला… हे ऐकल्यावर रावतेंच्या संतापाचा पाराच चढला…. कोण म्हणालं असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना दमात घ्यायला सुरुवात केली. परवा गारपिट झाल्यानंतर आज आम्ही काय पैशाच्या नोटा घेऊन तुमच्या दारात उभं राहायचं का असा सवालच रावतेंनी विचारला. मंत्री येणार दिलासा देणार या आशेवर आलेल्या शेतकऱ्यांचा रावतेंनी पार भ्रमनिरास केला. मंत्रीच जर शेतकऱ्यांच्या अंगावर असे ओरडले तर त्यांनी कुणाकडं पाहायचं असा सवाल उपस्थित केला जातोय.