शिवसेना जनतेच्या बाजूने असल्याचा फक्त देखावा करते- अजित पवार

वेब टीम- एकीकडे आंदोलन करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावला जातो आणि दुसरीकडे बालविकास मंत्र्यांकडून महिलांसाठी योजना जाहीर केल्या जात आहेत. राज्यातील जनतेने आता सरकारचे हे दुटप्पी राजकारण लक्षात घेतले पाहीजे.  पाच हजाराच्या तुटपुंज्या पगारात आज कुणीही काम करत नाही. शेतामध्ये मजुरी करणाऱ्या भगिनींना देखील ३०० रुपये रोजंदारी मिळते. अंगणवाडी सेविका कुपोषित, गर्भवती महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न करते. त्यांना फक्त १५० रु. रोज मिळतात. हा कसला न्याय? असा सवाल अजित पवार यांनी सरकारला विचारला.

शिवसेनेवर टीका करत अजित पवार म्हणाले, शिवसेनेची दुटप्पी भूमिका यातही दिसून येते. बिल आणत असताना, निर्णय घेत असताना शिवसेना गप्प बसते. कॅबिनेटमध्ये तोंड उघडत नाही. मात्र सभागृहात आम्ही जनतेच्या बाजूने असल्याचा नुसता देखावा करते.

अंगणवाडी सेविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केलेली नाही. आज काही निर्णय महिला व बालविकास मंत्र्यांनी जाहीर केले. पण हे करत असताना त्यांनी मेस्मा लावून त्यात खोच ठेवली. वास्तविक आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे आंदोलनापासून कुणालाही अडवता येत नाही. अधिवेशनात जनतेचे प्रश्न सुटावे अशी प्रत्येकाची मागणी असते. अंगणवाडी सेविकांवर अन्याय होत आहे. सरकार त्यांच्यावर मेस्मा का लावत आहे? मेस्मा लावू नये अशी प्रत्येक सदस्याची मागणी आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. सर्व प्रश्न सुटतील असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

विधानपरिषदेत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा मागे घेणार नसल्याचे सांगितले. यामुळे राष्ट्रवादीसहित सर्व आमदारांनी व्हेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

You might also like
Comments
Loading...