विजय औटींच्या गढीला त्यांचेच जुने मित्र व निष्ठावान शिवसैनिक सुरुंग लावणार ?

प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार व गेल्या ३ पंचवार्षिक पारनेर तालुक्यावर एकहाती वर्चस्व असलेले शिवसेनेच्या वरिष्ठ गोटातील विश्वासू आमदार विजयराव औटी यांना पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत धक्का बसण्याचे वृत्त महाराष्ट्र देशाने काल प्रसिद्ध केले होते. या सर्व राजकीय घडामोडींमागे आमदार विजयराव औटी यांचेच जुने सर्वपक्षीय मित्र व निष्ठावान शिवसैनिक असल्याचे उघड होत असून, त्यांनीच आमदार औटी यांच्या पारनेरच्या गढीला सुरुंग लावला असल्याची चर्चा संपूर्ण पारनेर तालुक्यात होत आहे.

आमदार विजय औटी यांच्या बरोबर राजकारण शिकलेले त्यांच्याबरोबर असणारे पण आमदार विजयराव औटी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन शिवसेना सोडून गेलेले व हकालपट्टी झालेले जुने निष्ठावान शिवसैनिक यांनी आता आमदार औटी यांना खिंडीत गाठण्यासाठी चंग बांधला आहे.

अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात याचीच सर्वात जास्त चर्चा पसरली असल्याने आता परत पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत आमदार विजयराव औटी व त्यांचे जुने नाराज मित्र, निष्ठावान शिवसैनिक यांच्यातील घमासान तालुक्यासह जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे. या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार याकडेही सर्वांचे बारीक लक्ष असून राजकीय विश्लेषकांनी तर आमदार विजयराव औटी यांना १०० टक्के धक्का बसणार असल्याचे सांगितले आहे.

परंतु आमदार विजयराव औटी ऐन वेळेस चमत्कार करतील व नगरपंचायत शिवसेनेच्या म्हणजे आमदार विजयराव औटी यांच्याच गटाच्या ताब्यात राहील असा आमदार विजयराव औटी समर्थकांना विश्वास आहे.पारनेर नगरपंचायत निवडणूक लागल्यानंतर अचानकच नाराज शिवसेना नगरसेवकांनी आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात बंड पुकारले असून सर्व नाराज शिवसेना नगरसेवक व अपक्ष नगरसेवक अज्ञात ठिकाणी सहलीला गेले आहेत, या सर्व घटनेचे पडद्यामागील सूत्रधार आमदार विजयराव औटी यांचे जुने मित्र व निष्ठावान शिवसैनिक असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे,

यासाठी आमदार विजयराव औटी यांच्या सर्वपक्षीय विरोधकांनी कंबर कसली असून आमदार विजयराव औटी यांना त्यांच्याच होम पिचवर क्लीन बोल्ड करण्यासाठी अनेकांनी आपापले राजकीय कसब पणाला लावल्याचे दिसत आहे. आता या वर्चस्वाच्या लढाईत आमदार विजयराव औटी बाजी मारणार की, त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन शिवसेना व आमदार विजयराव औटी यांना सोडून गेलेले त्यांचे मित्र व निष्ठावान शिवसैनिक बाजी मारणार हे उद्या दुपारपर्यंत तालुक्यासह जिल्ह्याला कळणार आहे.

पारनेर मध्ये घडत असलेल्या या राजकीय घडामोडींमागे काही महिन्यांपासून शिवसेनेत होणारा अंतर्गत कलह कारणीभूत असून, शिवसेनेतील जुन्या व नव्या वादाला बरोबरच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर वाचा फुटली आहे. याला गेल्या १४ वर्षात आमदार औटी यांनी बरोबर असणाऱ्या शिवसैनिकांना विश्वासात न घेता एकाधिकारशाहीने केलेला कारभार कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे २७ फेब्रुवारी रोजी शिवसेना आमदार विजयराव औटी यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यास पारनेर शहरात आले होते. या मेळाव्यात आमदार विजयराव औटी व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. काही अपवाद वगळता आमदार विजयराव औटी यांच्यावर खुश झालेल्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आमदार विजयराव औटी आपण आता पण आमदार आहात व पुढेही आमदार राहणार आहेत असे सांगून उद्याच्या काळात आपल्या हुशारीचा पक्ष नक्कीच उपयोग करेल अशी शाबासकी पण दिली होती.

परंतु मेळावा संपून उद्धवजी ठाकरे मुंबईकडे जात असतानाच आमदार विजयराव औटी गट व शिवसेनेतील नाराज गटात वाद निर्माण झाला, आमदार विजयराव औटी गटाने सर्व वादास दुसऱ्या गटास कारणीभूत धरले व इथेच वादाची ठिणगी पडली व कधी नव्हे ते आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात पारनेर मध्ये शिवसेनेअंतर्गत कोणीतरी रणशिंग फुंकले परंतु आमदार विजयराव औटी यांनी कौशल्याने हे बंड त्वरित शांत करत विरोधी गटाकडून संघटनेची पदे काढून घेत विरोधकांना पक्षातून निलंबित पण केले.

याचा राग नक्कीच विरोधी गटाला आला, परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याने त्यांना शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतू आता आमदार विजयराव औटी यांच्याविरोधात गेलेल्या नाराज शिवसैनिक नगरसेवकांना व अपक्ष नगरसेवकांना मदत करण्याची संधी व आमदार विजयराव औटी यांना कोंडीत पकडून शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसमोर अपमान करण्याची संधी शिवसेनेतून निलंबित केलेला गट कदापि सोडणार नसून, अजूनही शिवसेना वरिष्ठ पातळीवर संबंध असल्याने निलंबित गट पारनेरवर आमदार विजयराव औटी यांचे एकहाती वर्चस्व नसल्याचे व आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात त्यांच्याच गावातील नगरपंचायतीतील जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक असल्याचे दाखवून देण्याच्या संपूर्ण तयारीत आहे.

याचाच एक अध्याय पारनेर नगरपंचायत निवडणुकीत पाहायला मिळणार असून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, तसेच जशास तसे उत्तर देण्यासाठी व आमदार औटी यांना कपाळमोक्ष करण्यासाठी शिवसेनेतून निलंबित केलेला गट, आमदार विजयराव औटी यांचे जुने सहकारी मित्र, नाराज शिवसैनिक, बंडखोर नगरसेवक, आमदार विजयराव औटी यांचे सर्वपक्षीय विरोधक सरसावले असून नगरपंचायत मधील सर्व असंतुष्ट शिवसेना नगरसेवकांसह अपक्ष नगरसेवक यांना घेऊन त्यांनी अज्ञात ठिकाण गाठले असून, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड होईपर्यंत ते या घडामोडींवर लक्ष ठेऊन असणार आहेत. पुत्र प्रेमापोटी पारनेर शहरासह तालुक्याचे भवितव्य अंधारात घालण्याचा आमदार विजयराव औटी यांना काहीही अधिकार नसल्याचे काही नगरसेवक दबक्या आवाजात बोलत आहेत.

तसेच उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांच्या नगरपंचायतीमधील एकाधिकारशाहीला पण सर्व नगरसेवक कंटाळले असून आता सर्वांनी याची उघड चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून घडत असलेल्या या राजकीय घडामोडींना आमदार विजयराव औटी विरोधक सर्वपक्षीय मित्रांची, सर्वपक्षीय विरोधकांची चांगलीच साथ मिळत असल्याचे दिसून येत असून नगरपंचायत निवडणुकीत आमदार विजयराव औटी यांच्याच वार्ड मधून दणक्यात अपक्ष निवडणूक लढवून निवडून आलेल्या माजी पंचायत समिती सदस्य व आमदार विजय औटी यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या शंकर नगरे यांच्या पत्नी वर्षा शंकर नगरे यांची पण साथ लाभली असून सर्व असंतोषाला शंकर नगरे व नगरसेवक वर्षा नगरे यांच्या मार्फत आता वाचा फुटली आहे.

आमदार विजयराव औटी यांच्या वार्डात अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाच्या उमेद्वाराविरोधात अपक्ष नगरसेवक वर्षा शंकर नगरे यांनी निवडणूक लढवली होती व त्या दणक्यात निवडून आल्या. त्यावेळेस वर्षा शंकर नगरे यांना पाडण्यासाठी ज्यांच्या फौजेची मदत शिवसेनेला झाली, आता त्याच फौजेची मदत शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या नगरसेवकाला पाडण्यासाठी होणार आहे. यामध्ये भाजपा नेते व पारनेरमधील एक बडे व्यापारी यांचा उघड हात आहे, कारण त्यांच्या बंधुला शिवसेनेने उपनगराध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता व तो पाळला नाही, तसेच त्यांचे दुसरे मित्र नगरसेवक यांच्या पत्नी यांना पण नगराध्यक्ष करण्याचा शब्द दिला पण ६ महिन्यांपूर्वी सभापती पदावर त्यांची बोळवण केल्याने ते पण नाराज झाले आहेत.

याचबरोबर काही अपक्ष नगरसेवक यांना दिलेले शब्द फिरवल्याने सर्वांनी आता आमदार विजयराव औटी यांनाच चकवा देत उघड बंड केले असल्याचे दिसत आहे. बरेच नगरसेवक पारनेर शहरात नसून काही व्यापारी असणारे नगरसेवक पण आपापले फोन बंद करून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.पारनेरमधील या नाराज शिवसेना व अपक्ष नगरसेवकांची फौज काही जुन्या निष्ठावान शिवसैनिकांना घेऊन शिवसेनेच्या काही ठराविक वरिष्ठ नेत्यांना व मंत्र्यांना भेटण्याचे पण संकेत असून त्यांच्या कानावर आमदार विजयराव औटी व त्यांचे सुपुत्र उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांची हुकूमशाही पद्धत घालणार आहेत, तर काही नेत्यांच्या व मंत्र्यांच्या गाठी भेटी झाल्याचे पण वृत्त आहे.

याचबरोबर बाकीच्या पक्षांनी पण या नाराजांना जवळ करून आपलेसे केल्याचे वृत्त असून भाजपाचे नेते यात आघाडीवर आहेत. ते भाजपाच्या पण नेत्यांना व मंत्र्यांना भेटणार असून आगामी राजकीय वाटचाल व आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात चाललेल्या या लढाईत भाजपाची पण भरीव मदत घेण्याच्या तयारीत सर्वजण आहेत.

आता या सर्व वादळी राजकीय घडामोडींमधून जुन्या मित्रांनी, सर्वपक्षीय विरोधकांनी, अपक्ष नगसेवकांनी, नाराज शिवसेना नगरसेवकांनी केलेले बंड शांत करण्यात व नगरपंचायतीवर आपली सत्ता अबाधित ठेवण्यात आमदार विजयराव औटी व त्यांचे सुपुत्र उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यशस्वी होतात की, आमदार विजयराव औटी यांचे जुने मित्र, सर्वपक्षीय विरोधक, अपक्ष नगरसेवक व नाराज शिवसेना नगरसेवक आमदार विजयराव औटी यांना धक्का देत नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावतात याकडे पारनेर शहर व तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे व कार्यकर्त्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.