३७० वर मतदान होत असताना काश्मिरी नेत्यांच्या इशाऱ्यावरुन खा. कोल्हे संसदेतून पळून गेले – आढळराव

टीम महाराष्ट्र देशा: कलम ३७० वर मतदान होत असताना काश्मीरी नेते फारुक अब्दुलांच्या इशा-यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे समर्थनार्थ लोकसभेत बोलल्या. तर खा. अमोल कोल्हे संसदेतून पळून गेले. जे काश्मिरी नेत्यांच्या इशाऱ्यावरुन पळून जातात त्यांनी माझ्या निवृत्तीची काळजी करू नये, अशी टीका शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला होता. आता विधानसभेच्या निमित्ताने आढळराव आणि खा. कोल्हे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हे यांना निवडून दिल्याचा लोकांना आता पश्चाताप होत असल्याची टीका आढळराव पाटील यांनी केली होती. तर जनतेने दिलेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा, असा टोला कोल्हे यांनी लगावला होता.

दरम्यान, कोल्हे यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्ट्राचार केल्यानेच लोकांनी राष्ट्रवादीला राज्यातून संपविली आहे. त्यामुळे त्यांचे नेते नैराश्यात आहेत. तुमच्या पायगुणाने झालेली राष्ट्रवादीची अवस्था राज्य जाणतोय. त्यामुळे उगाच हुरळून जावून मला टार्गेट करण्यापेक्षा पक्षाचा विचार करावा, अशी टीकाही आढळराव यांनी केली आहे.