सत्तेतून बाहेर पडण्याची मानसिकता आहे का?उद्धव ठाकरेंनी आमदारांना केली विचारणा.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाच्या जवळ :संजय राऊत

वेब टीम; एन.डी.ए. मधील प्रमुख घटक पक्षांपैकी एक असलेला पक्ष म्हणजे शिवसेना .सत्ता स्थापनेच्या आगोदर पासून सुरु असलेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत . वारंवार होणारे अपमान,मंत्र्यांना दिलेले मर्यादित अधिकार आणि इतर मुद्यांवरून त्रस्त शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत .

आज मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदार -खासदारांची महत्वाची एक बैठक पार पडली . मातोश्रीवर झालेली बैठक अत्यंत खासगीत घेण्यात आली. बैठकीचे तपशील बाहेर पडू नयेत, यासाठी नेते मंडळींच्या मोबाईल-लॅपटॉपवरही बंदी घालण्यात आली होती. इतकंच नाही, तर नेत्यांच्या पीएंनासुद्धा मातोश्रीवर प्रवेश नव्हता. बैठकीत सत्तेत राहायचे नाही यावर चर्चा झाली.

बैठकीनंतर संजय राऊत काय म्हणाले ?,
शिवसेनेची विकासकामं होत नसल्यानं मुख्यमंत्र्यांना शेवटचं अल्टीमेटम द्यायचं ठरलं. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी विकास कामं होत नसल्याची उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. शिवसेनेच्या मंत्र्यांनाच अधिकार नसल्याने काम होत नसल्याची खंत व्यक्त केली. ‘आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत.सत्तेतून बाहेर पडायचं का, यावरही चर्चा झाली.’महाराष्ट्रात महागाई वाढली आहे , प्रचंड नाराजी आहे या नाराजीचा फटका सेनेला बसू नये , यासाठी राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला , सरकारच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यावा ,सत्तेत राहायचे नाही यावर चर्चा झाली.जर विकासकामं होत नसतील तर निर्णय घ्यायची वेळ आली आहे, तुमची मानसिकता आहे का? अशी उद्धव ठाकरेंनी आमदारांना विचारणा केली. त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आम्ही सोबत असल्याचं आमदारांनी आश्वासन दिलं आहे.

यापूर्वी देखील शिवसेनेने अनेक मुद्द्यांवरून भाजप विरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे . सामना मधून देखील दररोज सरकारी धोरणांवर टीका करण्यात येते मात्र भाजपकडून सेनेला किवा सेनेकडून करण्यात येणाऱ्या टीकेला फारसे महत्व देण्यात येत नाही. त्यामुळे आज झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आगामी काळात भाजपविरोधात आणखी आक्रमक झालेली पहायला मिळण्याची शक्यता आहे.