fbpx

विधानसभेत आमदारांची संख्या घटली, शिवसेनेसाठी धोक्याची घंटा.

shivsena flag

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुका आणि काही महिन्यांवर असणाऱ्या राज्यातील विधान सभेच्या निवडणुका पाहता आता प्रत्येक पक्ष आप-आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संघटीत करत आहेत. मात्र हे संघटन शिवसेनेच्या बाबतीत कुठे तरी कमी पडताना दिसत आहे. कारण विधान सभेतील शिवसेनेच्या तीन आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता विधान सभेत शिवसेनेचे संख्याबळ घटताना दिसत आहे. सध्या विधानसभेमध्ये शिवसेनेचे अधिकृत ६० तर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेले मनसे चे आमदार शरद सोनावणे यांना धरून ६१ एवढे संख्याबळ आहे.

औरंगाबादच्या कन्नड विधानसभेचे आमदार हर्षवर्धन जाधव, लोहा-कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि विदर्भातील वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. दरम्यान वारंवार चर्चा करूनही मराठा आरक्षणाचे घोंगडे सरकार कडून भिजत ठेवले जात आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड महानगरपालिका निवडणुकीवेळी भाजपाला पाठिंबा देत शिवसेनेशी बंडखोरी केली होती. त्यानंतर चिखलीकर यांनी शिवसेना आमदारकीचा राजीनामा दिला.

विदर्भातले शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभेचे आमदार बाळू धानोरकर यांनी नाराज होऊन शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र ऐन निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना-भाजपाने युती केल्याने त्यांच्या इच्छचे या युतीमुळे मरण झाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. मात्र आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.