केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीला शिवसेना, आमदार, खासदार देणार एक महिन्याचे वेतन

मुंबई: केरळमध्ये आलेल्या पुराच्या महाप्रलयाने हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. देशभरातून केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. दरम्यान, पूरग्रस्तांसाठी शिवसेनेने पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

मुसळधार पावसाने केरळमधील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, पावसाने घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण केरळ जलमय बनले आहे. तर आतापर्यत ४०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अनेक राज्य केरळच्या मदतीला धावून आली आहेत. याच भूमिकेतून शिवसेनेकडून केरळसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

शिवसेना नेते आणि बांधकाम मंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य आणि कपडे मागील आठवड्यात केरळला पाठवण्यात आले होते. यानंतर आता पक्षातील सर्व खासदार आमदार आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देतील अशा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. हा सर्व निधी केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीस दिला जाणार आहे.

You might also like
Comments
Loading...