बीड पालिकेतील वादग्रस्त फलक शिवसेनेने हटवला

बीड : बीड मध्ये एमआयएम व काकू- नाना आघाडीतर्फे मंगळवारी उर्दू भाषेतील फलक लावण्यात आला होता मात्र शिवसेनेने आपल्या नेहमीच्या स्टाईल ने आंदोलन करत हा फलक गुरुवारी शिवसेनेने हटविला. हा फलक त्यामुळे संपुर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पहायला मिळाले.

बीडमध्यये काकू- नाना आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी पालिकेच्या दर्शनी भागावर उर्दू फलक लावला होता. ही बाब शिवसेनेला चांगलीच खटकली. गुरुवारी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जि.प. सदस्य किशोर जगताप, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, सुनील अनभुले, उल्हास गिराम, शिवराज बांगर, संजय उढाण, संतोष कुटे, लक्ष्मण विटकर आदी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता पालिकेत पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांची भेट घेऊन उर्दू फलक हटविण्याची मागणी केली. जावळीकरांना भेटून शिष्टमंडळ बाहेर पडत असतानाच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन उर्दू फलक काढून फेकला. त्यानंतर टेबल, काचेची तोडफोडही केली. पालिकेच्या छतावर नादुरुस्त बल्ब व पथदिवे ठेवण्यात आले होते. ते देखील खाली फेकून दिले. त्यामुळे पालिकेच्या आवारात काचांचा खच पडला होता. शिवसेनेचे कार्यकर्ते तेथून निघून गेल्यानंतर शहर ठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले. परिस्थिती चिघळू नये यासाठी दंगल नियंत्रण पथकही पाचारण करण्यात आले. उर्दू फलक हटविल्यानंतर पालिकेत मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पोलिसांनी पांगवली यावेळी पालिकेला अक्षरश: छावणीचे स्वरुप आले होते