आधी विश्वास नांगरे पाटलांनी राजीनामा द्यावा – शिवसेना

Vishwas-Nangre-Patil

टीम महाराष्ट्र देशा – लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे मंगळवारी उघड झाले आहे.

मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी कोल्हापुरात शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. शिवसेनेने आज आयजी ऑफिसवर मोर्चा काढून सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

काय आहे अनिकेत कोथळे प्रकरण?

लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या कोठडीत असलेल्या आरोपीचा सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकाने थर्डडिग्रीचा वापर करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी अखेर उजेडात आला.हा खून पटविण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळून गेल्याचा बनाव रचण्यात आला, हेही आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कामटेंसह पाच पोलिस व एक झिरो पोलिस अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना अटकही करण्यात आली आहे. विश्वास नांगरे-पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत माहिती दिली.

नांगरे-पाटील यांची पत्रकार परिषद –

पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर अशी पथकातील अटक केलेल्या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, शासकीय पदाचा गैरवापर करणे, आरोपींना मारण्यासाठी थर्डडिग्रीचा वापर करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात येणार असल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.