प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये-शिवसेना

'दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओता'

टीम महाराष्ट्र देशा- प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये असा सल्ला सामनाच्या आजच्या संपादकीय मधून देण्यात आला आहे . दलित संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन, शिवसेनेनं सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राज्यातील परिस्थितीवर सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल याच अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो. इंदिराजी यांच्या हत्येनंतर देशभरात शिखांचे हत्याकांड, रक्तपात सुरू असताना मुंबईतील शीख समाजाचे रक्षण झाले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच याची आठवण देखील या लेखातून करून देण्यात आली आहे.

सामनातील आजचा अग्रलेख

bagdure

छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुले, शाहू आणि डॉ. आंबेडकरांचा महाराष्ट्र जातीयतेच्या आगडोंबात जळतो आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून ज्या बातम्या येत आहेत त्या कानात उकळते तेल ओतणाऱ्या आहेत. भीमा-कोरेगाव येथे ‘शौर्य’ दिवस साजरा करण्यावरून ठिणगी पडली व त्या ठिणगीच्या ज्वालांनी राखरांगोळी होताना दिसत आहे. आंबेडकरी बौद्ध समाज विरुद्ध ‘मराठे’ असा हा संघर्ष महाराष्ट्राच्या रस्त्यांवर भडकला आहे, पण महाराष्ट्र स्वतःशीच लढत आहे व महाराष्ट्राचे मोठेपण ज्यांच्या डोळ्यात खुपते अशांनी भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचे काम सुरू केले आहे. कालपर्यंत किती जणांना भीमा-कोरेगावचे युद्ध व शौर्य दिवसाविषयी माहिती होती? भीमा-कोरेगाव महाराष्ट्राच्या नकाशावर नेमके कुठे आहे याची माहिती कालपरवापर्यंत अनेकांना नव्हती. १८१८ साली एक युद्ध लढले गेले आणि त्या युद्धावरून २०१८ साली ‘जातीय हिंसा’ भडकवली जात असेल तर समाज २०० वर्षांत पुढे सरकलाच नाही व जातीयतेच्या डबक्यात अडकून पडला आहे. संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान व मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडी यांनी मिळून

भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाकडे
आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो. इंदिराजी यांच्या हत्येनंतर देशभरात शिखांचे हत्याकांड, रक्तपात सुरू असताना मुंबईतील शीख समाजाचे रक्षण झाले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. महाराष्ट्रात जातीय तणाव वाढला तर हे राज्य तोडू पाहणाऱ्यांचे फावेल. महाराष्ट्राचे हित ज्यांना पाहवत नाही त्यांनाच हे जातीय दंगे हवे आहेत, पण राज्याच्या फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे प्रकार आता रोजच घडू लागले आहेत. हवा बदलत आहे व बुडबुडे फुटत आहेत. भीमा-कोरेगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दंगलीनंतर प्रत्येक राज्यकर्ता असे आदेश देतच असतो. त्यात नवे ते काय? पण दंगलखोर प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात पडद्यामागून सूत्रे हलवीत आहेत व बाजूच्या राज्यांतील लोक आमच्या राज्यात येऊन वातावरण बिघडवत आहेत

याची कल्पना राज्यकर्त्यांना
असायला हवी होती. मृताच्या नातेवाईकांना सरकारने दहा लाखांची मदत केली, पण गेल्या २४ तासांतील दंगलीने सरकारचे कोट्यवधीचे नुकसान झाले. सामान्य लोकांच्या गाड्या, घरांना, दुकानांना आगी लागल्या. त्यांचे नुकसान कोणी भरून द्यायचे? मुंबई, ठाणे, नाशिक, मराठवाड्यातील बौद्ध समाजाचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. आगी व तोडफोड संपलेली नाही. १९९२च्या मुंबईतील दंग्यात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व त्यांचे सरकार संपूर्ण अपयशी व हतबल ठरले होते आणि समाजकंटक राष्ट्रद्रोह्यांच्या हाती मुंबईची सूत्रे गेली तेव्हा शिवसेनेला तिसरे नेत्र उघडून निरपराध्यांचे रक्षण करावे लागले. तो काळ हिंदुत्वाच्या शौर्याचा व गौरवाचा होता म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी शौर्य दिवसाच्या नावाखाली महाराष्ट्राला वेठीस धरावे काय? इतिहासावर जगता येत नाही. तो नक्कीच प्रेरणादायी असतो. इतिहासाची पाने चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास घडवा असे शिवसेनाप्रमुखांचे सांगणे होते. आम्ही त्याच मार्गाने महाराष्ट्राला पुढे नेऊ इच्छितो. बौद्ध बांधवांनाही आमची हात जोडून नम्र विनंती आहे, ‘‘तुम्ही त्याच मातीची लेकरे आहात.’’ पुन्हा शिवसेनाप्रमुखांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘‘बाबासाहेबांच्या लेकरांनो, तुमचे धर्मांतर झाले आहे, रक्तांतर नाही!’’ त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राचा आहे. या सर्व परिस्थितीत आज सरकारची भूमिका नक्की काय आहे? पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. निवडणूक लढवणे आणि सरकार व पोलिसांच्या मदतीने त्या जिंकत राहणे हेच एकमेव सरकारी कार्य बनते तेव्हा राज्यातील ठिणग्यांचा हा असा उद्रेक होतो. सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा. राज्य पेटले आहे. ती शेकोटी एक दिवस तुम्हालाही खाक करील!

You might also like
Comments
Loading...