मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयातचं, शिवसेनेचा भाजपला टोला

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना आता निती आयोगाच्या उपाध्यक्षांनीच अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. तर दुसरीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नेमके चालयं तरी काय असा प्रश्न आता समोर आला आहे ? तर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येण्याचे मूळ कारण नोटाबंदी आणि GST असल्याचे आर्थिक तज्ञांकडून सांगितले जात आहे.

देशाच्या विदारक आर्थिक परिस्थितीवरून शिवसेनेने भाजपचे चांगलेचं कानटोचले आहेत. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून देशाच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात आहे. नोटबंदीत अनेकांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात पांढरा झाला हे मान्य केले पाहिजे, पण कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या गमावल्या हे सुद्धा कटू सत्य आहेच असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

नोटबंदी ज्यांच्या कारकीर्दीत झाली ते अरुण जेटली दिल्लीच्या रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करत आहेत व आणखी एक माजी अर्थमंत्री चिदंबरम हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत, पण सीतारामन सांगतात हा भ्रष्टाचार नोटबंदीनंतरचा, म्हणजे गेल्या साडेतीन वर्षातला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान मागील 70 वर्षातील देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वात कठीण काळ सध्या सुरु असल्याचं निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. मागच्या 70 वर्षात देशात इतका चलन तुटवडा पहिल्यांदाच झाला असून सरकारनं परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेतल पाहिजे. आणि उपाययोजना केल्या पाहिजेत, असे राजीव कुमार म्हणाले.

तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा केला आहे. चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धामुळे जग मंदीच्या झळा सोसतंय. अशावेळी, भारतीय अर्थव्यवस्था डळमळू न देता ती अधिक बळकट करण्यास केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.