‘तुझ माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ शिवसेना-भाजप एकत्र ?

मुख्यमंत्री म्हणतात शिवसेना आणि भाजप एकत्रच!

मुंबई: शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सत्तेत असूनही शेवसेनेची भूमिका भाजपविरोधी राहिली आहे. मुंबई मनपाच्या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेना उमेदवाराला पाठींबा दिल्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ शिवसेना आणि भाजप एकत्रच आहोत. आम्ही हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी एकत्रच आहोत आणि एकत्रच लढू’अशी प्रतिक्रिया दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी अगोदरच युती तोडलेली आहे, असे स्पष्ट केले.

‘तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी परिस्थिती सध्या भाजप आणि शिवसेनेची झाली आहे. अर्थसंकल्पावरील उत्तरातील भाषणात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना- भाजप एकत्र असून पुढील निवडणूक एकत्रच लढवतील, असे म्हटले होते. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनीही युतीचे संकेत दिले. शुक्रवारी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. एवढेच नव्हे, तर वायएसआर आणि टीडीपी केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. शिवसेनेने मात्र या प्रस्तावाच्या वेळेस तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

लोकसभेत सरकारविरोधात येणाऱ्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळेस शिवसेना सोबत राहील की विरोधात, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी सांगितले, ‘शिवसेना आणि भाजप एकत्रच आहेत आणि एकत्रच राहतील यात शंका नाही. राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी एकत्रच असून पुढेही एकत्रच लढू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘राष्ट्रवादी’ म्हणजे कोण, असे विचारत मुख्यमंत्री म्हणाले, ‘मला माहितीच होते तुम्ही हा प्रश्न विचाराल म्हणूनच मी राष्ट्रवादी हिंदुत्ववादी हे दोन शब्द एकत्रच उच्चारले. राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी एकत्रच आहेत आणि राहतील. याबाबत काहीही चिंता करू नका. ’