कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’ लावा; सामनामधून भाजपवर टीकास्त्र

वेबटीम : सध्या राज्यभरात नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसनेनेकडून भाजपला टार्गेट करण्यात आल आहे. ‘विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तोतर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱ्यानो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’ लावा! असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.

सामना संपादकीयमधील मुख्य मुद्दे
पूर्वाश्रमीची सगळीच सरकारे आणि राज्यकर्ते तद्दन नालायक होते. राज्य कारभार कशाशी खातात हेच त्यांना ठाऊक नव्हते. आता आम्हीच काय तो या महाराष्ट्राचा आणि देशाचा उद्धार करू, अशा गमजा मारणाऱया मंडळींचे बुरखे दररोजच टराटरा फाटत आहेत. विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकऱयांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणाऱया लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरन होत आहे.

रडगाणे ऐकण्यासाठी

राज्यकर्त्यांना निवडून देत नाही. कोळशाचा पुरवठा कोणी करायचा, त्याची साठवणूक कोणी करायची, किती करायची हा सर्वस्वी सरकारचा विषय आहे. वीजनिर्मितीसाठी कोळसा आवश्यक आहे हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर कोळशाचा पुरेसा साठा करून का नाही ठेवला? टंचाई-टंचाई म्हणून तोच तो कोळसा किती दिवस उगाळत बसणार? पुन्हा कितीही उगाळला तरी शेवटी कोळसा तो कोळसाच! त्यामुळे तेच ते रडगाणे जनतेला ऐकवण्यापेक्षा एवढय़ा दिवसांत कोळशाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न का नाही केलेत?

महाराष्ट्राला अंधकार देणा-यांना

दूर करू आणि महाराष्ट्रात प्रकाश आणू शकतील अशांना महाराष्ट्राची सूत्रं देऊ हेच आपल्याला ठरवायचंय’ असा दिव्य संदेश मुख्यमंत्री या व्हिडीओतून देताना दिसतात. महाराष्ट्राने सूत्रे सोपवली खरी, पण आता तर आधीपेक्षा अधिक काळोख दाटून आलाय. त्यामुळे ‘मुख्यमंत्र्यांनी आपलाच हा व्हिडीओ पुन्हा बघायला हवा’ अशा मल्लिनाथीसह स्वप्नाळू प्रचाराची धुलाई सोशल मीडियावर सुरू आहे.