आ परिचारकांचे निलंबन मागे घेतल्याने शिवसेना आक्रमक

प्रशांत परिचारकांनी केले होते सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

मुंबई: सीमेवरील सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे काल निलंबन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. आज विधिमंडळ सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर शिवसेना आमदारांनी परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीवेळी पंढरपूरमधील भोसे येथे बोलताना प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर चारी बाजूने टीका होवू लागल्याने दीड वर्षासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, सत्ताधारी भाजपशी असणाऱ्या जवळीमुळे काल त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.
“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.