fbpx

मेटेंना धक्का,शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये

बीड : शिवसंग्रामचे दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटेंना ग्रामविकासमंत्री पंकज मुंडेनी चांगलाच धक्का दिला आहे. या पक्ष प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे अशी या सदस्यांची नावे असून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये प्रवेश केला.

राज्यात भारतीय जनता पक्षाची शिवसंग्राम पक्षाशी युती आहे, बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांवर अन्याय करतात असा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. यामुळे यापुढे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणार नाही परंतु राज्यात भाजपसोबत काम करणार असल्याचा निर्णय विनायक मेटेंनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र आता या दोन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंडेंवर नव्हे तर मेटेंवर कार्यकर्ते नाराज आहेत कि काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, याआधी देखील शिवसंग्रामचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विनायक मेटे यांची साथ सोडून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. आता दोन मातब्बर नेते भाजपच्या गळाला लागल्याने विनायक मेटे पक्षातच एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.