fbpx

स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानाने युतीतून बाहेर, मग विनायक मेटे किती दिवस करणार दुजाभाव सहन

विरेश आंधळकर : आगामी लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे २०१४ नंतर देशभरात विजयी घौडदौड करणाऱ्या भाजपच्या अश्वमेधाला लगाम लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तिन्ही राज्यांच्या निवडणुका आणि नजीकच्या काळात घडलेल्या उलथापालथीमुळे येत्या काळात महाराष्ट्रात देखील राजकीय नाट्य रंगणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोलल जात आहे. राज्यातील सत्तेमध्ये सहभागी असणारी शिवसेना आणि महाआघाडीतील इतर पक्ष देखील भाजपपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत राहिलेले विनायक मेटे २०१४ च्या मोदी लाटेत भाजपच्या नौकेत स्वार झाले होते. मात्र आता भाजपचे वारे फिरल्याचे दिसताच मेटे यांनी देखील पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात बीड जिल्हा परिषदेत भाजपचा पाठींबा काढण्यापासून झाली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम, स्वाभिमानी पक्ष आणि रासपने भाजपशी महाआघाडी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना यापूर्वीच महाआघाडीतून स्वाभिमानाने बाहेर पडली आहे. तर रासपचे महादेव जानकर हे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना मंत्रिमंडळातून डावलेले गेले तसेच कार्यकर्त्यांना देखील सत्तेपासून दूर ठेवल्याची खदखद शिवसंग्रामला सतावते आहे. यातच देश आणि राज्यामध्ये भाजप विरोधात जनाधार तयार होताना दिसत आहे. दुसरीकडे विनायक मेटे यांचे होमग्राउंड असणाऱ्या बीड जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामला कायम डावलल्याचा आरोप केला जात आहे. मागील चार वर्षातील हे सर्व चित्र पाहता विनायक मेटे यांनी आता भाजपशी फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच देशात भाजपचे वारे फिरल्याने देखील मेटे राजकीय भूमिका बदलताना दिसत आहेत.

विनायक मेटे यांचा आजवरचा राजकीय इतिहास पाहिल्यास त्यांनी कायम स्वतःला आणि आपल्या संघटनेला सुरक्षित राजकीय भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मुद्यावर कायम आक्रमक असणारे विनायक मेटे यांनी १९९० च्या दशकात मराठा महासंघापासून सुरुवात केली होती, मराठा महासंघ शिवसेना – भाजपच्या सोबतीने युतीमध्ये असताना १९९५ मध्ये मेटे यांनी युतीतर्फे विधानp परिषदेत आमदार करण्यात आले. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर मेटे यांनी मराठा महासंघाची साथ सोडत हातामध्ये घड्याळ बांधले. मात्र राष्ट्रवादीमध्ये देखील अनेकदा वाद निर्माण झाले होते. पुढे मेटे यांनी स्वत:ची वेगळी चूल मांडत शिवसंग्रामच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय वाटचाल केली आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत मेटे हे महाआघाडीत सामील झाले. मात्र मागच्या चार वर्षामध्ये भाजपने मंत्रीपद असो कि इतर सत्ता विनायक मेटे आणि त्यांच्या शिवसंग्रामला फाट्यावर मारले. यामध्ये पंकजा मुंडे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

दरम्यान, भाजपकडून दिली जाणारी वागणूक आणि राज्यातील जनतेचा मूड पाहता मेटे यांनी पुन्हा एकदा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवात जरी बीड जिल्हा परिषदेवरून झाली असली तरी शेवट हा महायुतीमध्ये होतो का हे पाहन महत्वाच ठरणार आहे. तसेच आक्रमक आणि स्वाभिमानी असणारे विनायक मेटे अजून किती दिवस युतीमध्ये दुजाभाव सहन करणार हा देखील पश्नच आहे.