केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण; तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक व सुटका

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे: अहमदनगर मधील केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह दहा जण आज कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले होते, त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे.

अहमदनगर केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने घटनास्थळी तोडफोड केली होती. याप्रकरणी सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी दिलेल्या फियार्दीवरून माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह इतर ६०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या आधी पोलीसांनी ३२ शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांना जामीन मिळाला आहे.

मंगळवारी संभाजी कदम यांच्यासह विशाल वालकर, प्रशांत गायकवाड, सागर थोरात, अभिषेक भोसले, अदिनाथ राजू उर्फ लक्ष्मण जाधव, तेजस गुंदेचा, बंटी उर्फ कुणाल खैरे, उमेश काळे, सचिन शिंदे, सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी अशा निंबाळकर हे ११ जण कोतवाली पोलीसांना शरण आले.

दुपारी तीन वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांच्या न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने गुन्ह्याचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. यावर आरोपी पक्षाच्यावतीने अ‍ॅड राहुल पवार यांनी युक्तीवाद करत या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असल्याने आरोपींना जामीन द्यावा अशी माणगी केली.

न्यायालयाने दोन्ही बाजुने म्हणने ऐकून घेतल्यानंतर सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर आरोपीच्यावतीने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला असून जामीन मंजूर झालेल्यांना दर शनिवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे.

केडगाव तोडफोडप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. गेल्या महिनाभरात पोलीसांनी या गुन्ह्यातील ४३ जणांना अटक केली. यातील अनेकजण स्वत:हून पोलीसांत हजर झाले. राठोड मात्र हे अद्यापपर्यंत पोलीसांत हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलीस त्यांना कधी अटक करणार असा प्रश्न आहे.