fbpx

बसच्या डिक्कीच्या उघड्या दरवाजाची धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू

अभिजित कटके

पुणे, २९ जानेवारी, (हिं.स.) : एसटी महामंडळाच्या पुण्याहून दादरला निघालेल्या शिवनेरी बसच्या डिक्कीच्या उघड्या दरवाजाची धडक बसून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना काल (रविवारी) रात्री साडेआठच्या सुमारास खडकी सर्वत्र विहार कॉलनी बस स्टॉपवर ही दुर्दैवी घटना घडली.दीपक भास्कर सोरटे (वय 55) आणि जॉर्ज आशीर्वादन अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

दोघांच्या छातीमध्ये दरवाजाचा पत्रा घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोग्यदास आरीक स्वामी (वय 62) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संतोष प्रल्हाद मदने- (वय 32 रा इंदोली, कऱ्हाड) या शिवनेरी बसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.प्राथमिक माहितीनुसार, तिघेजण मित्र असून रविवारी दुपारी ताडीवाला रस्त्यावरील चर्चमध्ये प्रार्थना करून पीएमपी बसने खडकीला निघाले होते.

पुणे- मुंबई रस्त्यावर सर्वत्र विहार कॉलनी बस स्टॉपवर रात्री साडेआठच्या सुमारास दुसऱ्या बसची वाट पाहत असताना पुण्याहून दादरच्या दिशेने निघालेल्या शिवनेरी बसच्या (एम एच 11 टी 9264) डिक्कीच्या उघड्या असलेल्या दरवाजाने तिघांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये सोरटे आणि आशीर्वादन याचा मृत्यू झाला तर आरोग्यदास गंभीर जखमी झाले. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.