समाजप्रबोधन करणारे ढोल !

ढोल ताशांशिवाय पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुक अशक्यच .पुणेकरांच्या ढोल ताशा हा जिव्हाळ्याचा विषय. या ढोल ताशांच्या माध्यमातून जर एखाद्या मंडळाने ढोलवादनामधून समाजप्रबोधन केले तर ? ही कल्पना पुण्याच्या शिवनेरी ढोल पथकाला सुचली आणि अवतरले समाजप्रबोधन करणारे ढोल.

शिवनेरी ढोल पथकाच्या वादकांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही ढोलवादनाचा सराव शाळेत किंवा नदीकाठी करत असतो. एकदा शाळेतील भिंतीवर असलेले सुविचार पाहून आमच्या डोक्यात कल्पना आली की हे सुविचार ढोलावर रंगवले तर ? ही कल्पना सर्वांना आवडली. त्यातूनच पथकातील वादकांनी स्वखर्चातून ढोल रंगवायला घेतले. पथकात एकूण 110 ढोल आहेत त्यापैकी 45 ढोल रंगविण्यात आले आहेत.

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ ‘रक्तदान श्रेष्ठदान’ ‘प्लास्टीकचा वापर टाळा’ असे निरनिराळे 45 संदेश लिहिण्यात आले आहेत. या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कल्पना नागरिकांना इतकी आवडली की ते ढोल सोबत सेल्फीही काढत आहेत. त्यामुळे त्यांचे हे संदेश देणारे ढोल समाजमाध्यमाद्वारे व्हायरल होणार हे नक्की !