शरद पवार तोंडघशी, शिवेंद्रराजे पक्षांतराच्या निर्णयावर ठाम

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारचे राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करत आहेत. तर आज शिवेंद्रराजे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे आता शिवेंद्रराजे हे भाजपात जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र शिवेंद्रराजे यांच्या पक्षांतरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. शिवेंद्रराजे भाजपात जाणार नाहीत, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता.

गेले काही दिवस शिवेंद्रराजे भोसले भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. या चर्चेची पार्श्वभूमी घेत शरद पवार यांनी शिवेंद्र राजे भाजपात जाणार नसल्याचं सांगितल होत. तर खुद्द पवारांनी शिवेंद्रराजे यांची भेट घेऊन पक्षांतराचा निर्णय बदलावा अशी गळ घातली होती. मात्र शिवेंद्रराजेंच्या निर्णयानंतर पवार यांनी व्यक्त केलेला विश्वास हा व्यर्थ गेला आहे. तर पवार तोंडघशी पडल्याचं दिसत आहे.

आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी राजीनाम्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, यासाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

शनिवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रात्री उशिरा पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शिवेंद्रराजेंनी आजवर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. या भेटीत शरद पवार यांनी ‘उदयनराजेंचे मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका’, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिवेंद्रराजे आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून दगा फटका होणार आहे, अशी भीती शिवेंद्रसिंहराजे यांना वाटत आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपात जाणार असल्याचं बोललं जात होते. मात्र आता शिवेंद्रराजे यांचा निर्णय झाला आहे. ते आज कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. आणि उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.