शिवेंद्रसिंहराजेंनी मागितला उदयनराजे आणि संभाजीराजेंचा पाठींबा

udayan raje,sambhajiraje,shivendrasinh

सातारा : मराठीला अभिजात भाषेच महत्व मिळविण्यासाठी रिंगणात उतरण्याचा निर्णय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केला आहे. २६ जानेवारीला या मागणीसाठी नवी दिल्ली येथे होणा-या धरणे आंदोलनाचे नेतृत्व आपण शिवछत्रपतींचा वारसदार या नात्याने करणार आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खासदार उदयनराजे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे तसेच लोकसभेत हा प्रश्न मांडावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर खासदार संभाजीराजेंनी याबाबत पंतप्रधानाकडे पाठपुरावा करावा. सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठीप्रेमींनी पंतप्रधान मोदीपर्यंत ही गोष्ट पोहचवावी. मराठी बांधवांनी प्रचंड संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Loading...

 शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, एखाद्या रोग्याची नाडी पकडून तज्ज्ञ लोक त्याच्या प्रकृतीविषयी भाष्य करतात, त्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्रातील भाषेवरून त्या-त्या राष्ट्राच्या सामर्थ्याची कल्पना येते. छत्रपती शिवरायांपूर्वी पोवाडे का झाले नाहीत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजेच मराठी भाषेचा अभ्युदय होय,असे लोकमान्य टिळकांनी केसरीमधील अग्रलेखात लिहिले होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा 11 कोटी मराठी भाषिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत माझ्याहस्ते मराठी अभिजात भाषा देण्यासाठीच्या मोहिमेचा शुभारंभ सातारा येथे झाला होता. त्यावेळी मसाप प्रतिनिधी विनोद कुलकर्णी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा अभिजात समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी या मोहिमेला पाठिंबा दिला होता. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध होईल आणि मराठीच्या विकासाला चालना मिळेल असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केले .

 यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ या सातारकर मंडळींनी पुढाकार घेऊन चळवळ उभी केली, ही क्रांतिकारकांचा वारसा लाभलेल्या साता-याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. म.सा.प.चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह प्रा. रंगनाथ पठारे यांनीही या पुढाकाराचे कौतुक केले असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आता या मागणीसाठी 26 जानेवारीला आपण सर्व मराठीजनांनी दिल्लीला धडक द्यायची असून, या आंदोलनाचे नेतृत्व शिवछत्रपतींच्या घराण्याचा वारसदार म्हणून मी स्वीकारले असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी म.सा.प.च्या शाहूपुरी शाखेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख पत्रे पाठविण्यात आली होती. त्याचप्रमाणे म. सा. प. चे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. यासंदर्भात एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने पाठविले होते. मात्र, ही याचिका फेटाळल्याची माहितीही पंतप्रधान कार्यालयानेच कळविली होती. पुढील कार्यवाही सुरू झाली असून, याबाबत कॅबिनेट नोट तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही कळविले होते. या घटनेला आता सहा महिने झाले आहेत. केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी हवी आहे. या शेवटच्या टप्प्यासाठी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत धरणे आंदोलनाचा निर्णय म.सा.प.ने घेतला असून, त्याद्वारे पंतप्रधानांचे लक्ष या विषयाकडे वेधले जाणार आहे. या आंदोलनाला खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी सक्रीय पाठिंबा देऊन लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 दरम्यान सुरुची राडा प्रकरणानंतर प्रथमच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदारांना आवाहन केल्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. यावेळी त्यांनी खासदार संभाजीराजे यांनीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तर मराठी बांधवांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून याविषयी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना टॅग करावे तसेच अन्य सोशल मिडियाच्या व्यासपीठावरुन लक्ष वेधावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रस्तावित आंदोलनास दिल्लीला जाण्यासाठी साता-यातील साहित्यिक राजेंद्र माने, उमेश करंबेळकर, चंद्रकांत बेबले, संतोष यादव यांच्यासह अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण आदी 25 जणांनी बुकिंगही केले असून, म.सा.प.च्या या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी विनोद कुलकर्णी यांनी केले.Loading…


Loading…

Loading...