सातारा लोकसभेचं काय करायचं ? शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवारांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंचे कौतुक केले. त्यानंतर साताऱ्यातील एका लग्न सोहळ्यात शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंनी खांदा दाबला. पुढे कुडाळ येथील एका कार्यक्रमातही त्यांनी शिवेंद्रराजेंचा खांदा दाबून त्यांच्याशी हास्यविनोद केला. अशात कार्यकर्ते संभ्रमात असताना शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी पवारांनी लोकसभा निवडणुकीचे काय करायचे ? असा सवाल शिवेंद्रराजेंना केला. या प्रश्नाचे उत्तर मात्र शिवेंद्रराजेंनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

दोन्ही राजेंच्या या भुमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच राजघराण्याच्या प्रतिष्ठेला तडा जावू देणार नाही, अशी भूमिका शिवेंद्रराजेंनी मांडली. रविवारी उदयनराजे यांनीही भूमिका स्पष्ट केली. टाळी एका हाताने वाजणार नाही. बघू भविष्यात काय होईल ते. ते म्हणालेत हसलं म्हणजे काय होत नाही. खोडसाळपणाचेही हसणे असते असे सांगत उदयनराजेंनी पलटवार केला. दोन्ही राजांमध्ये राजकीय जुगलंबदी सुरु असतानाच सोमवारी शिवेंद्रराजेंनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी सौ. प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, माजी. जि. प. सदस्य राजू भोसले उपस्थित होते. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या निमित्ताने झालेल्या भेटीत शरद पवार आणि शिवेंद्रराजे यांच्या आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही चर्चा झाली. शरद पवार यांनी आ. शिवेंद्रराजेंना विचारले, लोकसभा निवडणुकीचे काय करायचे? तुम्हाला काय वाटते? तुमची काय भूमिका आहे? असे प्रश्न विचारले. पवारांच्या या प्रश्नांवर आ. शिवेंद्रराजेंनी दिलेले उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांनी पवारांपुढे आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मात्र, ती सांगण्यास शिवेंद्रराजेंनी नकार दिला.

युती ची वाट न पाहता भाजपा लागला तयारीला. पहा. कोण आहे हा भाजपचा संभाव्य उमेदवार..?