fbpx

शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांच्या मैत्रीचा फटका उदयनराजेंना बसणार का ?

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीच्या सुकर मार्गात आता अडचण निर्माण झाली आहे. कारण निवडणुकीचा काळ जसा जवळ येऊ लागला आहे तसे युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांच्यात जवळीकता वाढत चालली आहे. मात्र ही जवळीकता उदयनराजे यांच्या अडचणीत वाढ करणारी आहे.

शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत नरेंद्र पाटील यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांना टोला लगावला. यावेळी पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्या नावाने घोषणा देखील दिल्या. त्यामुळे शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांची दोस्ती पुन्हा एकदा रंग धरू लागली आहे.मात्र या दोस्तीचा फटका उदयनराजे यांना बसतो की काय अशी चर्चा रंगत आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकी मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुन्हा वर्णी लागली आहे. तर त्यांच्या विरोधात युती कडून शिवसेनेचे आमदार नरेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात अंतर्गतवाद होते. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या दोन्ही राजांमध्ये दिलजमाई केली होती.