Ambadas Danve | औरंगाबाद : शहराच्या नामांतरावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून नामांतराला जोरदार विरोध होत आहे. औरंगाबादच्या नामांतराला विरोध म्हणून आज औरंगाबादेत एमआयएम व इतर संघटनांकडून निषेध मोर्चा काढला जात आहे. मागील काही दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील हे शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. इम्तियाज जलील यांच्या याच विरोधाला शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी उत्तर दिले आहे. एमआयएम ही एक जातीयवादी संघटना असून, ते त्यांचा आदर्श औरंगजेबाला मानतात, अशी टीका अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे.
औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये सध्या शाब्दिक टीका सुरू आहेत. ते औरंगजेबाच्या कबरीवर लोटांगण घालायला जातात त्यामुळे त्यांना औरंगजेब फ्री आहे यात काही गैर नाही. अशी टीका यावेळी दानवे यांनी केली. दरम्यान इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. शिवसेनेचा हाच हेतू होता. मंत्रिमंडळात जेव्हा या निर्णयाची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते गप्प बसले होते का? असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला होता. एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आम्ही कोर्टात धाव घेऊ, असाही इशारा दिला आहे.
औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर या नामांतराला एमआयएम कडून विरोध केला जातोय, असे दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, औरंगाबाद शहर काय एमआयएमची जाहागीरदारी आहे का? त्यांनी सांगावं की शहराला संभाजी महाराजांचे नाव का नको आणि औरंगजेबाचे का असावे. औरंगजेब हा वाईट कृतीचा माणूस होता. त्यामुळे चुकीचा इतिहास हा मिटवलाच पाहिजे. हे महत्त्वाचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शहरात कोणतेही काम केले नाहीत आणि आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करायचं म्हणून नामांतराला विरोध करण्याचे काम एमआयएम करत आहे. यांचा हा विरोध जास्त दिवस चालणार नाही, असेही यावेळी दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<