fbpx

श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

vanga famelly

पालघर: भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही अशी टीका करत भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार चिंतामण वनगा कुटुंबांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपाच्या दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी आणि पदाधिकारी यांनी रात्री वनगांच्या घरी हजेरी लावली. तर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना काल दुपारपासूनच अज्ञात स्थळी हलवलं आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा प्रवास

तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार व पालघर जिल्ह्यातील भाजपचा चेहरा असलेले वनगा १९९० ते १९९६ या काळात भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते. अकराव्या लोकसभेमध्ये १९९६ साली सर्वप्रथम खासदार झाले. त्यानंतर १९९८ च्या बाराव्या लोकसभेसाठी झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा १९९९ च्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत वनगा विजयी झाले. २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. या नंतर त्यांनी २००९ साली विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व आमदार झाले. २०१४ सालच्या निवडणुकीत आमदार असतानाच पुन्हा लोकसभा निवडणूक लढविली व खासदार झाले.लोकसभेत चिंतामणी या टोपण नावाने ओळखले जायचे.३० जानेवारी रोजी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले .

नेमकं काय म्हणणे आहे वणगा कुटुंबियांचे ?

आमच्या भागात भाजपला फक्तं दोन मतं पडायची. त्या परिस्थितीत आमच्या वडिलांनी परीश्रम घेऊन पक्ष वाढवला. ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली पण आम्हाला मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. भाजपने आम्हाला अक्षरशःवाऱ्यावर सोडलं.आता आम्ही भाजप पक्ष सोडत आहोत .

2 Comments

Click here to post a comment