शिवाजीनगर भुयारी मार्ग : खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट

Imtiaz Jaleel

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी रेल्वे बोर्डचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनित शर्मा यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी तत्वावर मान्यता मिळालेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गच्या कामास प्रशासकीय मंजुरी देवुन काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश संबंधितांना निर्गमित करण्याची मागणी केली. यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा, पिटलाईन, विद्युतीकरण, मॉडर्न रेल्वेस्टेशन यासह मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी व रेल्वेविभागाची विकासात्मक प्रलंबित असलेल्या मागण्या, प्रकल्प, प्रस्ताव व कामाबाबत सविस्तर चर्चा करुन कामे त्वरीत मार्गी लावण्याची मागणी केली.

खासदार इम्तियाज जलील यांनी शिवाजीनगर येथे भुयारी मार्ग व्हावा यासंबंधी केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे यशस्वीरित्या पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर भुयारी मार्गच्या ३८.६० करोड रुपयाच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी तत्वावर मान्यता दिली होती. रेल्वे विभागाने भागीदारी तत्वावर १६.५५ करोड निधीची मंजुरी देवुन महाराष्ट्र शासनास २२.०५ करोड रुपयाच्या निधीची उपलब्धता करुन देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या भागीदारी तत्वावरील हिश्याचे २२.०५ करोड रुपयाच्या निधीची मंजुरी करुन घेतली होती.

खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्डचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनित शर्मा यांना रेल्वे रुळापलीकडील २ लाख हुन जास्त नागरीकांना वाहतुक व दळणवळण करतेवेळी येणाऱ्या गंभीर समस्या व अडअडचणींची सविस्तर माहिती देवुन शासनस्तरावरुन काम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी करुन लोकांची व्यथा मांडली. खासदार इम्तियाज जलील यांनी निदर्शनास आणुन दिलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गच्या प्रलंबित कामाची व त्याकरिता शासनस्तरावर वेळोवेळी यशस्वीरित्या केलेल्या पाठपुराव्याची सुनित शर्मा यांनी गांभीर्याने दखल घेवुन शिवाजीनगर भुयारी मार्गच्या बांधकामास त्वरीत मान्यता देवुन प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या