कोरोनाविरोधात लढ्यासाठी शिवाजी विद्यापीठाचं रुग्णालयात रुपांतरासाठी चाचपणी

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोरोनाविरोधी लढ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. इथे तब्बल 1 हजार बेडचे विशेष आयसोलेशन रुग्णालय तयार करता येऊ शकतं. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विद्यापीठाच्या वसतिगृहात हे तात्पुरते रुग्णालय उभे करण्यासाठी विद्यापीठ परिसराची पाहणी करण्यात आली आहे. असं असलं तरी विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही.

शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस शेकडो एकर परिसरात आहे. या कॅम्पसमध्ये मुलांचे आणि मुलींची भव्य वसतीगृहे आहेत.या वसतिगृहातील प्रत्येक खोल्यांमध्ये किमान दोन बेड आहेत. त्यामुळे या वसतीगृहांचे रुग्णालयात रुपांतर करणं शक्य आहे. जवळपास एक हजार रुग्णांची व्यवस्थित सोय इथे होऊ शकते. या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्कालिन उपाययोजनेसाठी शिवाजी विद्यापीठातील मुले आणि मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी १ हजारहून अधिक बेड क्षमतेच्या रुग्णालयाची व्यवस्था होऊ शकते, असं निदर्शनास आलं. त्यामुळे इथेच हजार बेडचं रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी चाचपणी होत आहे.

याठिकाणी तात्पुरते रुग्णालय उभारण्याचे निश्चीत झाल्यास सध्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येईल. विद्यार्थ्यांचं जे काही साहित्य असेल, ते साहित्य स्वत: विद्यापीठ प्रशासन स्थलांतरित करुन देईल. दरम्यान, कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचली आहे. पेठ वडगावमधील एक आणि कोल्हापूर शहरातील दोघांचा समावेश आहे. पेठ वडगावमधील महिलेवर सांगलीतील मिरज इथे उपचार सुरू आहेत तर बाकी दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. कोल्हापुरात तिसरा रुग्ण 29 मार्चला रात्री आढळला.