शिवरायांनी रामदास स्वामींना इनाम म्हणून दिलेल्या गावांच्या सनदेचा शोध

टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील गुरुशिष्याच्या संबंधावर गेल्या अनेक वर्षापासून उहापोह सुरु आहे. आता यामध्येच इंग्लंडमधील ब्रिटीश लायब्ररीमध्ये रामदास स्वामींच्या चाफळ मठाच्या खर्चासाठी शिवाजी महाराजांनी गावं इनाम दिल्याच्या सनदेची छायांकित प्रत सापडली आहे. हि सनद 1678 साली लिहिलेली असून यावर शिवरायांचा शिक्काही आहे. एकंदरीतच या सनदेवरून शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या गुरु-शिष्याच्या नात्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.

1906 मध्ये शिवाजी महाराजांनी 33 गावं इनाम म्हणून दिल्याबाबतचं एक पत्र सापडले होते. मात्र याची मूळ प्रत उपलब्ध मिळाली नव्हती. दरम्यान इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत या मूळ पत्राची छायांकित प्रत सापडली असून कौस्तुभ कस्तुरे यांनी ती सर्वांसमोर आणली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभेत इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी या सनदेचे वाचन नुकतेच केले.

या सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण अकरा मुद्रा छायांकित करण्यात आलेल्या आहेत, तर पत्राच्या मुख्य बाजूवर असणारी अक्षरे हि बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी जुळती आहेत.