शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरु, मराठवाड्यासह नगरमध्ये घुमणार अमोल कोल्हेंचा आवाज

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा देखील काढली आहे. ही यात्रा सांगली, कोल्हापूर, सातारा येथील महापुरामुळे स्थगित करण्यात आली होती. मात्र आता सांगलो कोल्हापूर मधील परिस्थिती पूर्ववत होत आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेला पुन्हा सुरवात होणार आहे.

खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा या यात्रेत सहभाग असणार आहे.आता राष्ट्रवादीने १९ ते २६ ऑगस्टपर्यंतचे यात्रेचे वेळापत्रक पक्षाने जारी केले आहे. मराठवाड्यासह यवतमाळ व नगरच्याही काही भागातून ही यात्रा जाणार आहे. पैठण येथे १९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता जाहीर सभा होईल. दुपारी २ वाजता बदनापूर येथेही दुसरी सभा होईल. या यात्रेत मराठवाड्यातील सारकणी (किनवट), अंबाजोगाई येथे सभा तर परभणी व बीड येथे युवासंवाद होणार आहे.

आता पर्यंतच्या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. तर राज्य सरकारच्या चुकांचा पाढाचं जनतेसमोर वाचून दाखवला आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचाचं मुख्यमंत्री असा विश्वसनीय दावा केला आहे. महाराष्ट्रातील समस्यांची सोडवणूक करण्यात सरकार कसं अपयशी ठरलं आहे, हे आम्ही या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू. फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाजाच्या समस्या या यात्रेच्या माध्यामातून मांडल्या जातील असंही कोल्हेंनी यात्रेबाबत स्पष्ट केले होते.

दरम्यान ६ ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली आहे. तर खुद्द अमोल कोल्हे या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाची मोठी जबाबदारी आहे, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.