मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन आता दोन दिवस झाले आहेत. सध्या गोव्यात वास्तव करत असलेले आमदार आज रात्री 8 वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. गोव्याहून त्यांना मुंबईतील ताज प्रेसिडेंसी हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे. तसेच १८ तारखेला विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. याआधी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर हे आमदार मुंबईत येणार आहेत.
महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. या व्हीपमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहेत. हा व्हीप सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी लागू असणार आहे.
मात्र यानंतर आता सुनील प्रभू यांच्या या आदेशाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केराची टोपली दाखवली आहे. आमच्याकडे बहुमत आहे, दोन तृतियांश बहुमत आमच्याकडे असल्याने आम्हाला शिवसेनेचा व्हीप लागू होत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे गोव्याच्या विमानतळावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या व्हीपबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी शिवसेनेचा व्हीप आपल्याला लागू होऊ शकणार नाही, असं विधान केलं.
दरम्यान, उद्या सकाळी आठ वाजता भाजपाच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर विधानभवनात यांना एकत्र नेण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. कारण या बंडखोर आमदारांविषयी शिवसैनिकांच्या मनात प्रचंड राग आणि संताप आहे. त्यामुळे कोणता अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. बंडखोरांना मुंबईत येवू द्या. कोणताही विरोध, निदर्शने करू नका, असे शिवसैनिकांना सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<