कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड ?

DAVKHARE , NAJIB

प्राजक्त झावरे,पाटील: नुकतेच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार निरंजन डावखरे हे आपलं राष्ट्रवादीच होम ग्राउंड सोडून भाजपात दाखल झाले. त्यामुळे दुखावलेल्या राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांच्यासारखा ठाण्यातल्या तगडा उमेदवार डावखरेंना धडा शिकविण्यासाठी मैदानात उतरवला आहे.

नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिल्यामुळे डावखरेंना धक्का बसला आहे , अशी राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. राष्ट्रवादीने स्वतः शरद पवार यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले असून जोमाने तयारी सुरू केली आहे. तसेच आमदार संजय केळकर विधानसभेवर गेल्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपातून उमेदवारीसाठी इच्छूक असलेले ठाण्याचे संदीप लेले, रत्नागिरी चे विनय नातू हे डावखरेंच्या प्रवेशाने नाराज आहेत. त्यातून अंतर्गत दुही निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत.

शिवसेनेने पहिल्यांदाच कोकण पदवीधरच्या निवडणुकीत उडी घेतली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विश्वासू व ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूकित एकहाती विजय मिळाल्याने युवासेना पर्यायाने सेनेचा आत्मविश्वास या मतदारसंघात कमालीचा उंचावलेला आहे. त्यात ठाण्यातील अधिकच्या नोंदणीची मदत सेनेला होणार असल्याचा अंदाज  राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना मोरे यांनी केलेले काम उत्तम असल्याने त्यांना या मतदारसंघाशी संबंधित समस्या ज्ञात आहेत. संयमी, शांत, अभ्यासू, संपर्कशील अशी त्यांची छबी पदवीधरांना आकृष्ट करेल असा सेनेचा व्होरा आहे. अजूनही काही उमेदवार या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत पण खरी लढाई शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांच्यात होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

पदविधरांचा बेरोजगारीचा प्रश्न, विद्यापीठांची निकृष्ठता, तरुणांना व्यवसाय शिक्षणातील संधी असे प्रश्न दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर मात करण्यासाठी या मतदारसंघातील आमदारांनी लक्ष द्यावे, अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे.
एकंदरीत, निरंजन डावखरे यांनी पक्ष बदल्यालाने चुरस निर्माण झालेल्या कोकण मतदारसंघात सेनेच पारडे सध्या जड असल्याचे दिसून येत आहे.