शिवसेनेचे संजय मोरे यांचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेना विश्वास

eknath-shinde

मुंबई: कोकण पदवीधर मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. प्रामुख्याने शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीने कोकणात सध्या वातावरण तापू लागले आहे. मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य अशी फौज मतदारांपर्यंत पोहचत आहेत. दरम्यान, काल ठाण्यात मनपा क्षेत्रातील शिक्षक पदवीधर मेळावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

संजय मोरे हे तळागाळातील कार्यकर्त्यांमधून पुढे आलेले आश्वासक नेतृत्व आहे. शिक्षण सभापती असतांना शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेली भरीव कामगिरी तसेच ठाण्याचे लाडके महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उत्तम राहिली आहे. जनसामान्यांसाठी कायमच रस्त्यावर उतरून लढणारा अभ्यासू व्यक्ती ही त्यांची ओळख त्यांना निवडून आणायला हातभार लावेल. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सजग राहण्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आजही आम्ही आचरणातून दाखवत आहोतच. गद्दारी करून आपल्या स्वार्थासाठी पक्षाशी काडीमोड घेणाऱ्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल. ठाणे-कोकणात शिवसेना करत असलेली कामे आणि समाजाशी जोडलेली नाळ यामुळे संजय मोरे यांच्या मोठ्या फरकाने विजय निश्चितच आहे, असा विशास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

माझ्यावर केस दाखल आहेत, हो आहेत, पण कोणत्या हे शोधा ११ वी प्रवेश, महागाई विरोधातील आंदोलने, समाजाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्यामुळे झालेली आंदोलने यांच्या केसेस आहेत फक्त आणि त्या केसेसचा मला अभिमान आहे. कधीच रस्त्यावर न उतरलेल्यांना काय कळेल या केस काय असतात ते, असे म्हणत शिवसेनेचे पदवीधर उमेदवार संजय मोरे यांनी भाजपचे निरंजन डावखरे यांना टोला मारला. सध्या बेरोजगारीचा महत्वाचा प्रश्न पदवीधरांना भेडसावत आहे. त्यासोबतच शासकीय सेवेत असणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे हाही मोठा प्रश्न आहेच, कौशल्य शिक्षण देणाऱ्या दर्जेदार संस्थांची बांधणी व कोकण शालेय शिक्षणात नेहमीच अव्वल आहे परंतु स्पर्धा परिक्षेतही कोकणचे नाव पुढे आणण्यासाठी स्पर्धाकेंद्रांची निर्मिती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्याला आमदार रविंद्र फाटक, ठाणे स्थायी समिती सभापती राम रेपाळे, ठाणे शिक्षण सभापती विकास रेपाळे, कामगार नेते देविदास चाळके, ज्ञानेश्वर म्हात्रे इ. मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन सुनील फापाळे, ठाणे पालघर शिक्षक पतपेढी अध्यक्ष बाबाजी फापाळे आदींनी केले.

यावेळी, खानदेश मित्र मंडळ, एथिलटिक्स संघटना, एक्का फौंडेशन, नवी मुंबई शिक्षक संघ आदी विविध संघटनांनी आपला पाठिंबा देखील जाहीर केला. तसेच पालघरचे विठ्ठल ठाणगे, शहापूरचे नवनाथ पवार, अनिल सांगळे, प्रमोद पाटोळे, निरंजन पटवर्धन, विजय उदार, नवी मुंबईचे बोरसे, संजय मोरे, आत्माराम आग्रे, कल्याणचे विलास झुंझारराव आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...