fbpx

अरुण जेटलींच्या जाण्याने शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दुख:द निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त हा एक धक्काचं आहे. अरुण जेटली यांच्या जाण्यान शिवसेनेचे वैयक्तिक नुकसान झाले आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

‘अरुण जेटली यांचे निधन देशाला धक्का आहेच. पण शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंघ ठेवणारा महत्त्वाचा खांब कोसळला आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना आणि अरुण जेटली यांच्यात सलोख्याचे संबंध होते. भाजप शिवसेना युती कायम राहावी आणि ती टिकावी असे अरुण जेटली नेहमी म्हणत असत, अशा आठवणी शिवसेना खा. संजय राऊत यांनी सांगितल्या.

दरम्यान अरुण जेटली यांना प्रकृतीच्या कारणास्तव ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. तसेच अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव २०१९च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. अरुण जेटली हे देशाच्या राजकारणातील मोठे नेते होते. त्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देशाच्या अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारली होती.