‘राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा घेणे हा त्यांचाच कमीपणा’, शिवसेनेचे स्पष्टीकरण

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्हयांचा तीन दिवसाचा दौरा जाहीर केला होता. या दौऱ्यावर कॅबिनेटमध्ये जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली शिवाय या दौऱ्याला विरोधही करण्यात आला. कोश्यारी हे महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल मंगळवारी केला. त्यानंतर आता राज्यपालांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.

त्यांनी केलेल्या दौऱ्यातील बदलांमुळे राज्य सरकारच्या धोरणांवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. मात्र, यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा घेणे हा त्या पदाचा कमीपणा आहे. राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांना राजभवनावर बोलावू शकतात. म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात बदल केल्याचे समजते आहे’ असे सामंत म्हणाले. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अगोदर ते दि.५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ते नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार होते. पण आता राज्यपाल केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. ही चर्चा औपचारिक नसेल. राज्यपाल या नात्याने अधिकारी त्यांच्यासोबत चहा घेत संवाद साधतील अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर परभणी आणि नांदेड येथील विद्यापीठातील कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत पूर्ववत ठरल्याप्रमाणे होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या