शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; ‘या’ काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला

sanjay nirupam

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल संध्याकाळी भेट घेतल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच दोन पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार का? अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाल्याचा खुलासा भाजपने केल्यानंतर या चर्चांना तूर्तास विराम मिळाला आहे. मात्र, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र या भेटीवर खोचक टीका केली आहे.

शनिवारी दुपारी फडणवीस-राऊत यांची ग्रँड हयात या हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा अचानक समाजमाध्यमांवर सुरू झाली. त्या भेटीमध्ये नक्की काय घडले, येथपासून ते राज्यातील आघाडीचे सरकार पडणार का, येथपर्यंतच्या चर्चा रंगल्या होत्या. संजय निरुपम यांनी या भेटीवर नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये, अशी टीका त्यांनी केलीये.

असं वाटतंय शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्याची राजकीय कारकीर्दी उद्ध्वस्त करते. ही दुर्भावना नाही तर, वास्तविकता आहे,’ असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.

दरम्यान, भाजपने शनिवारी संध्याकाळी या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. सामनाच्या मुलाखतीसाठी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असं भाजपनं म्हटलं आहे. फडणवीस हे बिहार निवडणुकीच्या धामधुमीतून परतल्यानंतर दैनिक ‘सामना’साठी `’अनकट’ मुलाखत देणार आहेत. त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक होती, असेही स्पष्ट केले. त्याचप्रमाणे या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. अशाच प्रकारचा खुलासा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही केला. स्वतः फडणवीस यांनीही दरेकर यांनी प्रतिक्रियेत जे म्हटले आहे, तीच वस्तुस्थिती आहे, असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-