परळीत पंकजाच्या मतांना सुरुंग लावण्याचा शिवसेनेचा डाव?

shivsena, dhananjay munde and pankaja munde

संदीप कापडे

शिवसेनेने नुकताच परळी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे. शिवसेनेने हा निर्णय भाजपला चपराक म्हणून घेतला का? कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल होत. त्यामुळे परळी मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार भाजपच्याच मतांत जास्त फाटाफूट करेल आणि याचा फायदा धनंजय मुंडे यांना होईल, असे मानले जाते आहे.

निवडणुका राज्यात सर्वत्र होत असतात मात्र ज्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याच लक्ष लागून असत ती परळी विधानसभा निवडणूक. परळी विधानसभेची निवडणूक यावेळी शिवसेनाही लढणार आहे. शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना ”निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असून‘मातोश्री’वरुन हाच संदेश घेऊन मी आलो आहे,”अशी घोषणा शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी केली.

शिवसेनेच्या या घोषणेनंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या तिघांमुळे परळी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार, असे चिन्ह उमटत आहेत. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मागील निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते.

pankja win election in parali dist grampachat election
file photo

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेच्या निर्णयाच जरी स्वागत केलं असलं. तरी भाजपला मतांची फाटाफूट रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.  भाजपच्या नेत्यांनी शिवसेना स्वबळावर लढली तरी भाजपला नुकसान होणार नाही. असे विधान केले. मात्र भाजपला याचा फटका बसणार आहे. कारण मतदारांमध्ये भाजपने अपेक्षाभंग केल्याची चर्चा जास्त आहे. परळी मतदारसंघात मागील काही वर्षांत झालेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकहाती विजय मिळवून आपलेही वर्चस्व दाखवले आहे. गेल्यावर्षीच्या परळीच्या जिल्हापरिषदेच्या निवडणुका पाहिल्या तर १० परिषदेपैकी ८ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. यामुळे भाजपला परळी मतदारसंघात अस्तिव निर्माण करायला नक्कीच अवघड जाणार आहे.

निवडणुका येण्यास अजून वर्षभर तरी कालावधी आहे. तोपर्यंत अनेक सामाजिक-राजकीय घडामोडी घडतील. त्यामुळे पुन्हा शिवसेनेची भूमिका बदलणार का? याबाबत शंका आहे. कारण आजपर्यंत तरी शिवसेनेची घेतलेल्या निर्णयावर बदलती भूमिका पाहायला मिळाली आहे. मात्र स्वबळावर निवडणुका लढण्याच्या निर्णयाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पुनरुच्चारामुळे भाजपने नक्कीच कंबर कसली असावी.

मागच्या वेळी सर्वत्र भाजपच्या लाटेत इतर आमदार ५० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. पण परळी मतदार संघात २५ हजारांचाच फरक राहिला. तीन वर्षांत सत्तेच्या डामडौलात पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. त्यामुळे पंकजा यांनी सेनेचे आव्हान स्वीकारले असले तरी भाजपला मतांची फाटाफूट रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतही सेनेच्या उमेदवारीचा भाजपलाच फटका सहन करावा लागणार आहे.