काँग्रेसच्या दबावाखाली शिवसेना आपली भूमिका बदलणार नाही अशी अपेक्षा – देवेंद्र फडणवीस

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत बाजूने भूमिका घेतली होती. पण नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संदिग्ध अशी भूमिका मांडली आहे. हे विधेयक देशासाठी महत्वाचे आहे, ते कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, असे सुस्पष्ट निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात केले होते. सविस्तर सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत. आता केवळ राज्यातील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या कुठल्याही दबावात येऊन शिवसेना भूमिका बदलणार नाही, अशी अपेक्षा राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

तर राज्यात सरकार स्थापन होऊन १४ दिवस होत आले तरी मुख्यमंत्री अजूनही खातेवाटप करू शकलेले नाही, मग शेतकऱ्यांना तातडीने मदत केव्हा देणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कामकाज सल्लागार समितीची विधान भवन येथे बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधिमंडळाचे आगामी नागपूर अधिवेशन हे केवळ एक औपचारिकता म्हणून घेतले जात असून आम्ही हे अधिवेशन दोन आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी केली होती, मात्र ती सत्ताधारी पक्षाने मान्य केली नाही.

खातेवाटप झाले नसल्याने नेमके उत्तर कोण देणार, चर्चा कशा होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. महाराष्ट्रात अतिशय गतीने अनेक प्रकल्प राबविले जात होते, किमान त्यांची गती तशीच कायम राखावी, अशी आमची मागणी आहे. पुढच्या वर्षीची ४ कामे कमी झाली तरी चालतील, पण शेतकऱ्यांना तातडीने मदत आधी मिळायला हवी. यासाठी सरकारला संपूर्ण सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या