लोकसभा पोटनिवडणूकीसाठी शिवसेना मैदानात, भाजपच्या अडचणी वाढल्या

fadnavis-uddhav thakare

टीम महाराष्ट्र देशा- स्वबळाचा नारा दिलेल्या शिवसेनेने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. विधानपरिषद निवडणुकीसह आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत युती न करता शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे निश्चित झालं आहे.येत्या दोन दिवसात उमेदवार निश्चित होणार आहे. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय हा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भंडारा गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे. तर या मतदानाचा निकाल ३१ मे रोजी जाहीर होईल. तसेत पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही २८ मे रोजीच होणार आहे. पालघरमधील भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथील जागा रिक्त झाली होती. तर भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ज्यानंतर इथली जागाही रिकामी झाली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने पलूस कडेगाव मतदारसंघाचीही जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे सांगलीतही पोटनिवडणूक होणार आहे.

दरम्यान विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला तिसरा उमेदवारही घोषित केला आहे. हिंगोली-परभणी येथून विधानपरिषदेसाठी विपुल बजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.विपुल बजोरिया हे शिवसेनेचे अकोला-बुलडाणा विधानपरिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांचे चिरंजीव आहेत.शिवसेनेचं संख्याबळ जास्त असून आमचा उमेदवार जिंकेल, स्वबळावर निवडणूक जिंकू, असा दावा गोपीकिशन बजोरिया यांनी केला आहे.युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत , नाशिकमधून नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून ,कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता भाजप नक्की काय भूमिका घेते याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागल आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेसाठी निवडूण देण्यात येणा-या ६ जागांसाठी येत्या २४ मे ला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ मे ला होणार आहे. त्याबाबतची अधिसुचना निवडणूक आयोगाने काढली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था, परभणी हिंगोली, लातूर – बीड – उस्मानाबाद, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.