पीक विमा मिळवून देण्यासाठी ‘शिवसेना’ खंबीरपणे शेतकऱ्‍यांच्या पाठीशी- आ.अंबादास दानवे

ambadas danve

औरंगाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्‍यांच्या बांधापर्यंत पोहचण्यास विमा कंपनी प्रतिनिधी कमी पडत असल्याने शेतकऱ्‍यांना ऑनलाईन तक्रारीची मागणी न करता ऑफलाईन अर्ज घेऊन नुकसान भरपाईची नोंद घेण्याच्या सुचना शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. तसेच शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांमपर्यंत पीक विमा मदत केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा करत शेतकऱ्‍यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्‍यांच्या पाठीशी उभी असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

खरीप हंगाम हा शेतकऱ्‍यांना उत्पन्न मिळवून देणारा मानला जातो. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्‍यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील बहुसंख्य क्षेत्राला बसला असल्यामुळे तसेच तक्रारीची संख्या वाढत असल्याने  समन्वयक कमी पडत असल्याचे जिल्हा प्रमुख आमदार दानवे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्‍यांच्या लक्षात आणून दिले. त्यातच शेतकऱ्‍यांना ऑनलाईन तक्रार करणे ही खर्चीक बाब असल्याने ऑफलाईन अर्ज घेऊन पंचनामे करण्याच्या सुचना अधिकाऱ्‍यांना दिल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ४० हजार शेतकऱ्‍यांनी ऑनलाईन तक्रार अर्ज केले असून या तक्रार अर्जानुसार जवळपास ३० हजार शेतकऱ्‍यांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. यामध्ये मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मक्‍काचे १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला यापैकी नुकसान भरपाई म्हणून २५ टक्के विमा संरक्षण रक्कम देण्याच्या सुचना असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या वतीने हे अर्ज विमा कंपनी प्रतिनिधींकडे सोपविण्यात येणार आहे. दानवे यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख केतन काजे, प्रभाकर काळे, दिनेश मुथा, राजु वरकड, सुभाष कानडे, सचिन वाणी,  हनुमंत भोंडवे, यांना आपापल्या तालुक्यात पीक विमा मदत केंद्र उभारण्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या